स्पेन-जर्मनी अंतिम फेरीत
भारत-अर्जेन्टिना यांच्यात तिसऱ्या स्थानासाठी होणार लढत
वृत्तसंस्था/ चेन्नई
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या कनिष्ठ पुरूषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत स्पेनने बलाढ्या अर्जेंटिनाचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करत पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात जर्मनीने भारताचा 5-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. तिसऱ्या-स्थानासाठी आता भारत व अर्जेन्टिना यांच्यात 10 डिसेंबर रोजी लढत होईल.
या उपांत्य सामन्यात सुरूवातीपासूनच स्पेनने आक्रमक आणि वेगवान खेळावर अधिक भर दिला. 7 व्या मिनिटाला त्यांना पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि त्यांच्या मारीओ मिनाने या संधीचा फायदा घेत स्पेनचे खाते उघडले. 8 व्या मिनीटाला अर्जेंटिनाला पहिला कॉर्नर मिळाला, पण तो वाया गेला. स्पेनने आपल्या आक्रमक धोरणावर शेवटपर्यंत भर दिला. 17 व्या मिनिटाला स्पेनला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि अर्जेंटिनाचा गोलरक्षक रूईझने तो अडविला. 21 व्या मिनिटाला अर्जेंटिनाला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि त्यांच्या ज्युऑन फर्नांडीजने या संधीचा फायदा घेत आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 अशी बरोबरीत होते. 43 व्या मिनिटाला अर्जेंटिनाला चौथा पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण त्याचा लाभ त्यांना घेता आला नाही. 50 व्या मिनिटाला अर्जेंटिनाला आणखी एक कॉर्नर मिळाला. पण ही संधी स्पेनच्या बचाव फळीने यशस्वी होऊ दिली नाही. 56 व्या मिनिटाला स्पेनचा दुसरा आणि निर्णायक गोल अल्बर्ट सेराहीमाने केला. सामना संपण्यास 30 सेकंद बाकी असताना अर्जेंटिनाला 6 वा पेनल्टी कॉर्नर मिळाला पण तो वाया गेल्याने स्पेनने या स्पर्धेची पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठताना आतापर्यंत दोन वेळा विजेतेपद मिळविणाऱ्या अर्जेंटिनाचे आव्हान संपुष्टात आणले.
या स्पर्धेतील पाचवे आणि सहावे स्थानासाठी झालेल्या पात्रतेच्या सामन्यात बेल्जियमने गेल्या वेळेच्या उपविजेत्या फ्रान्सचा 3-2 असा पराभव केला. तसेच हॉलंडने न्यूझीलंडवर 6-3 अशी मात केली. पाचव्या-सहाव्या स्थानासाठी बेल्जियम व नेदरलँड्स आणि सातव्या-आठव्यासाठी न्यूझीलंड व फ्रान्स यांच्यात लढती होतील.