इटलीचा पराभव करत स्पेन बाद फेरीत
सर्बिया-स्लोव्हेनिया, डेन्मार्क-इंग्लंड सामने बरोबरीत
वृत्तसंस्था/ जेलसेनकिर्चेन (जर्मनी)
2024 च्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी येथे खेळविण्यात आलेल्या ब गटातील अतितटीच्या सामन्यात स्पेनने विद्यमान विजेत्या इटलीचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव करत शेवटच्या 16 संघात (बाद फेरी) प्रवेश मिळविला. या स्पर्धेतील अन्य सामन्यात सर्बियाने स्लोव्हेनियाला तर डेन्मार्कने इंग्लंडला बरोबरीत रोखले.
स्पेन आणि इटली यांच्यातील हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झाला. दोन्ही संघांनी दर्जेदार खेळ केल्याने फुटबॉल शौकिन खूष झाले. सामन्याच्या पूर्वार्धात स्पेनचा खेळ इटलीच्या तुलनेत अधिक आक्रमक आणि वेगवान होता. पण इटलीच्या भक्कम बचावफळीला भेदणे स्पेनला शक्य झाले नाही. मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता. उत्तरार्धातील खेळाला प्रारंभ झाल्यानंतर इटली संघातील हुकमी स्ट्रायकर रिकार्दो कॅलेफिओरीने स्पेनच्या खेळाडूंना हुलकावणी देत चेंडू गोलपोस्टपर्यंत आणला आणि नजरचुकीने तो गोलपोस्टमध्ये मारल्याने स्पेनला हा बोनस गोल मिळाला. सामन्यातील हा एकमेव गोलच स्पेनला विजय मिळवून दिला. स्पेनने आतापर्यंत तीन वेळा युरो चषक फुटबॉल स्पर्धा जिंकली असून आता ते विक्रमी चौथ्यांदा जेतेपद मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. स्पेन संघातील नवोदीत फुटबॉलपटू 16 वर्षीय लॅमीनी येमाल याचा खेळ उठावदार झाला. या सामन्यात निको विल्यम्सला सामनावीर म्हणून घोषीत करण्यात आले. स्पेन संघाने 2008 ते 2012 या कालावधीत जागतिक फुटबॉल क्षेत्रात आपली वेगळी ओळख करुन देताना युरो चषक तसेच फिफाची विश्वचषक फुटबॉल स्पर्धा जिंकली होती. मात्र फिफाच्या गेल्या तीन विश्वचषक फुटबॉल स्पर्धांमध्ये स्पेनचे आव्हान लवकरच संपुष्टात आले होते.
म्युनिच येथे गुरुवारी खेळविण्यात आलेल्या क गटातील सामन्यात सर्बियाने स्लोव्हेनियाला 1-1 असे गोल बरोबरीत रोखले. या सामन्यात दोन्ही संघांनी गोल करण्याच्या अनेक सोप्या संधी वाया घालविल्या. मध्यंतराला काही मिनिटे बाकी असताना स्लोव्हेनिया खाते उघडणार असे वाटत असतानाच स्लोव्हेनियाच्या इलेस्निकने मारलेला फटका गोलपोस्टच्या दांडीला आढळून बाहेर गेल्याने स्लोव्हेनियाची ही संधी हुकली. पण त्यानंतर 10 मिनिटांच्या कालावधीत कॅमीसेनिकने दिलेल्या पासवर इलेस्निकने स्लोव्हेनियाचे खाते उघडले. स्लोव्हेनियाचा हा एकमेव गोल 69 व्या मिनिटाला नोंदविला गेला. हा सामना स्लोव्हेनिया जिंकणार असे वाटत असताना 90 व्या मिनिटाला सर्बियाचा बदली खेळाडू लुका जोव्हिकने हेडरद्वारे अचूक गोल नोंदवून हा सामना 1-1 असा बरोबरीत सोडविला. हा सामना बरोबरीत राहिल्याने आता क गटात स्लोव्हेनिया 2 गुणासह दुसऱ्या स्थानावर असून इंग्लंडचा संघ या गटात पहिल्या स्थानावर आहे. सर्बियाचा संघ 1 गुणानी शेवटच्या स्थानावर आहे. सर्बियाचा पुढील सामना डेन्मार्कबरोबर तर स्लोव्हेनियाचा पुढील सामना इंग्लंड बरोबर होणार आहे.
क गटातील गुरुवारच्या अन्य एका सामन्यात इंग्लंडने डेन्मार्कला 1-1 असे बरोबरीत रोखले. हा सामना अनिर्णित राहिल्याने आता इंग्लंड संघाचे बाद फेरीतील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. इंग्लंडतर्फे हॅरि केनने तर डेन्मार्कतर्फे मॉर्टेन हिझुलमंडने गोल केला. इंग्लंडच्या हॅरि केनचा प्रमुख फुटबॉल स्पर्धेतील हा 13 वा गोल आहे.