स्पेस एक्सची अंतराळ मोहीम यशस्वी
4 अंतराळवीर पृथ्वीवर सुखरुप परतले : ड्रॅगन अंतराळयानाचे पाण्यात लँडिंग : परतताना 27000 किमी प्रतितास वेग
वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को
एलन मस्क यांच्या स्पेस एक्स या कंपनीचा पोलारिस डॉन क्रू रविवारी पृथ्वीवर परतला आहे. ड्रॅगन अंतराळयानाने दुपारी 1.06 वाजता फ्लोरिडाच्या टोर्टुगास किनाऱ्यावर लँडिंग केले आहे. पृथ्वीच्या वायुमंडळात प्रवेश करताना अंतराळयानाचा वेग 27 हजार किलोमीटर प्रतितासा इतका होता. हवेसोबतच्या घर्षणामुळे तापमान 1900 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते.
मस्क यांच्या कपंनीच्या फाल्कन-9 रॉकेटद्वारे पोलारिस डॉन मिशनला 10 सप्टेंबर रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. 5 दिवसांच्या या मोहिमेत 4 अंतराळवीर अशा अंतराळकक्षेत गेले होते, (1408.1 किमी) ज्यात 50 वर्षांपेक्षा अधिक काळापासून कुठलाच अंतराळवीर गेला नव्हता.
सुखरुप परतण्याचे होते आव्हान
कुठल्याही अंतराळ मोहिमेचा सर्वात अवघड हिस्सा पृथ्वीवर परतणे असतो. सुरक्षितपणे पृथ्वीवर पोहोचण्यासाठी क्रू ड्रॅगन कॅप्सूलने ‘डी-ऑर्बिट बर्न’ सुरू केले. सुमारे 27 हजार किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने अंतराळयाने पृथ्वीच्या वायुमंडळात प्रवेश केला. हवेशी टक्कर झल्याने घर्षण निर्माण झाले आणि तापमान 1900 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. 4 मीटर रुंद ड्रॅगन अंतराळयानाखाली असलेल्या हीटशील्डने अंतराळवीरांना या तापमानापासून सुरक्षित ठेवले आहे. अंतराळयान जसजसे खाली आले, त्याचा वेग कमी करण्यात आला होता.
याचा वेग अधिक मंद करण्यासाठी पॅराशूट उघडण्यात आले आणि पाण्यात लँडिंग जाले. तेथे एका विशेष बोटीवर पूर्वीपासूनच बचावपथक तैनात करण्यात आले होते. अंतराळवीरांना कॅप्सूलमधून बाहेर काढण्यापूर्वी बचावपथकाने अंतिम सुरक्षा तपासणी केली आणि मग त्यांना पाण्यातून जमिनीवर आणले गेले आहे.
दोन अंतराळवीरांकडून स्पेसवॉक
या मोहिमेचा उद्देश पहिली प्रायव्हेट एक्स्ट्राव्हीकलर अॅक्टिव्हिटी (स्पेसवॉक) होता. तसेच मानवी आरोग्याशी निगडित 36 संशोधने आणि प्रयोग देखील या मोहिमेत करण्यात आले. 12 सप्टेंबर रोजी 2 अंतराळवीरांना पृथ्वीपासून सुमारे 700 किलोमीटर उंचीवर स्पेसवॉक पेल. मिशन कमांडर जेरेड आइसेकमॅन आणि मिशन स्पेशलिस्ट सारा गिलिस यांनी सुमारे 10 मिनिटांसाठी अंतराळयानातून बाहेर पडत स्पेसवॉक केला. स्पेसवॉकनंतर अंतराळयानाच्या हॅचला बंद करण्यात आले. स्पेसवॉकवेळी अंतराळयानाचा वेग 25 हजार किमी प्रतितास इतका होता.
ऑर्बिटल क्लास रीयुजेबल रॉकेट
फाल्कन-9 एक रीयुजेबल (पुनर्वापरक्षम), टू-स्टेज रॉकेट असून त्याची निर्मिती स्पेसएक्सने पृथ्वीची कक्षा आणि त्यापुढेपर्यंत अंतराळवीर आणि पेलोड नेण्यासाठी केली आहे. ड्रॅगन अंतराळयान 7 अंतराळवीरांना अंतराळात नेण्यास सक्षम आहे. हे एकमेव खासगी अंतराळयान माणसांना अंतराळ स्थानकापर्यंत नेते. 2010 मध्ये ड्रॅगनची पहिली टेस्ट फ्लाइट झाली होती.
पोलारिस कार्यक्रम
पोलारिस डॉन हा पोलारिस कार्यक्रमाच्या तीन नियोजित मोहिमेपैकी पहिला असून याला जेरेड आइसेकमॅन यांचे वित्तसहाय्य लाभले आहे. तिसरी पोलारिस फ्लाइट स्टारशिपची पहिली क्रूड मिशन असणार आहे. स्टारशिप जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट असून त्याचे सध्या परीक्षण सुरू आहे.