स्पेस टेक स्टार्टअप पिक्सलने उभारले 835 कोटी
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारतातील स्पेस टेक स्टार्टअप पिक्सेल यांनी नुकतीच 835 कोटी रुपयांची उभारणी केली असल्याची माहिती आहे. ही भारतातील स्पेस तंत्रज्ञान क्षेत्रातील अशी कंपनी आहे जिने पहिल्याच निधी उभारणीत इतकी मोठी रक्कम जमा केली आहे. सदरच्या कंपनीने 2019 मध्ये स्टार्टअपचा पाया रचला होता. या नव्याने झालेल्या उभारणीनंतर आता कंपनीची निधी उभारणी 195 दशलक्ष डॉलर अर्थात 1840 कोटी रुपये इतकी झाली आहे.
कंपनीने उभारलेली रक्कम सॅटेलाइट जाळे मजबूत करण्यासाठी वापरणार आहे. तसेच अर्थ इंटेलिजन्स सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मच्या विकासासाठीही काही रक्कम वापरली जाणार असल्याचे समजते. या निधी उभारणीत सिंगापूरची सरकारी गुंतवणूक कंपनी टेमासेक व युकेतील स्पेस टेक वेंचर फर्म सेराफिम यांनी सहभाग घेतला होता. याशिवाय रॅडिकल वेंचर्स व ग्रोएक्स वेंचर्स यांनीही सहभाग घेतला होता. सोबत 360 वन अॅसेट व आयएमएम इन्वेस्टमेंट या सारख्या नवख्या गुंतवणूकदार कंपन्यांनीही सहभाग दर्शवला होता.
हा निधी उभारणीचा उपक्रम भारतात गतीने वाढणाऱ्या खासगी अंतराळ (स्पेस) क्षेत्रासाठी महत्त्वाचा म्हटला पाहिजे. सरकारने अंतराळ क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले केल्यानंतर स्पेस स्टार्टअपमध्ये जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले गेले आहे.