Satara News : पाटण तालुका विज्ञान प्रदर्शनात अंतराळ मॉडेल ठरले मुख्य आकर्षण
मरळी येथे तालुका विज्ञान प्रदर्शन; नागरिकांचा मोठा प्रतिसाद
नवारस्ता : पाटण तालुका शिक्षण विभागाच्या वतीने मरळी येथे आयोजित केलेल्या तालुका विज्ञान प्रदर्शनाला नागरिकांचा, पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि विज्ञानप्रेमी नागरिकांनी प्रदर्शनस्थळावर गर्दी केली. आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक उपाय आणि विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांनी सजलेले स्टॉल्स पाहण्यासाठी लोकांची विशेष उत्सुकता दिसून आली.
सातारा जिल्हा परिषद सातारा, शिक्षण विभाग, लोकनेते बाळासाहेब देसाई भवन पंचायत समिती शिक्षण विभाग पाटण आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ५३ वे पाटण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मरळी येथे सुरू आहे.विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेली सौरऊर्जा प्रकल्प, पर्यावरण संवर्धनावरील मॉडेल्स, रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, पाणी बचतीचे उपाय, आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिके ही प्रदर्शनाची प्रमुख आकर्षणे ठरली. कार्यरत मॉडेल्ससमोर प्रेक्षकांची विशेष गर्दी दिसत असून अनेकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांचे कौतुक केले.
प्रदर्शनस्थळी सुरक्षेची आणि व्यवस्थेची उत्तम तयारी केल्यामुळे गर्दी असूनही शिस्तबद्ध वातावरण कायम 15RO राहिले. शिक्षक आणि स्वयंसेवकांनी विविध विभागांमध्ये मार्गदर्शन करून पाहुण्यांचा अनुभव अधिक माहितीपूर्ण केला. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि विज्ञानावरील त्यांची पकड पाहून आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया उपस्थित पालकांनी व्यक्त केली. दरम्यान, संध्याकाळपर्यंतही पाहुण्यांची ये-जा सुरुच असल्याने प्रदर्शनाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आयोजकांनी दिली.