For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंतराळ हीच निर्णायक युद्धभूमी !

06:33 AM Sep 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
अंतराळ हीच निर्णायक युद्धभूमी
Advertisement

निवृत्त लेफ्टनंट जनरल पी. जे. एस. पन्नू यांनी लिहिलेल्या ‘तारामंडल संग्राम’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले आहे. या पुस्तकात ले. ज. पन्नू यांनी भविष्यकाळातील युद्धांमध्ये अवकाश किंवा अंतराळ कशी निर्णायक भूमिका साकारणार आहे, याची वास्तववादी आणि उपयुक्त मांडणी केली आहे. या पुस्तकाचा संक्षिप्त परामर्ष निवृत्त मेजर जनरल जगतबीर सिंग यांनी घेतला आहे....

Advertisement

युद्ध आणि अंतराळ

भविष्यकाळातील युद्धे केवळ भूमीवर किंवा तिच्यापासून काही अंतरावर असणाऱ्या आकाशात खेळली जाणार नसून, निर्णायक युद्धभूमी अंतराळ किंवा ‘तारामंडल’ हीच असेल, याची निश्चिती आहे. त्यामुळे भारताने या क्षेत्रात सामरिक प्रगती करणे ही काळाची आवश्यकता आहे. भारताने केवळ अंतराळात उपग्रह सोडता कामा नयेत, तर त्यांच्या भोवतीची परिस्थिती पाहण्याची, समजून घेण्याची आणि तिची सुरक्षिता राखण्याची या उपग्रहांची क्षमता असावयास हवी.

Advertisement

अंतराळाला सर्वाधिक महत्त्व

देशच्या सुरक्षा व्यवस्थेत आता अंतराळाला मोठे स्थान प्राप्त झाले आहे. अवकाशातून भूमीवर पाहिले असता सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक अशी अचूक माहिती मिळते. भूमीवर काय चालले आहे, हे अवकाशातून सर्वात चांगल्या प्रकारे समजते. त्यामुळे सामरिक विषयांसंबंधीचे निर्णय घेणे अत्यंत सुलभ होते. अवकाश तंत्रज्ञानात झपाट्याने झालेल्या प्रगतीमुळे युद्धांच्या स्वरुपांमध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन झाले असल्याने अवकाश क्षेत्रावर भर देण्यावाचून पर्याय राहिलेला नाही.

माहितीचे महत्त्व

आजच्या काळात युद्ध करताना कोणताही विस्कळीतपणा चालत नाही. अचूक माहितीच्या आधारावर हल्ले करून शत्रूला नेस्तनाबूत करणे या युद्धतंत्राला सर्वाधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. भूमीवरील शत्रूच्या हालचालींची ही माहिती लढणाऱ्या सेनेला अवकाशातून उपग्रहांच्या माध्यमातून मिळत असते. त्यामुळे शत्रूच्या मर्मस्थानावर थेट आक्रमण करणे सुलभ होते. म्हणूनच या माहितीचे महत्त्व आहे.

अंतिम युद्धभूमी

अवकाशात सोडलेल्या उपग्रहांनी पाठविलेल्या या माहितीचे युद्धातील निर्णायक महत्त्व लक्षात घेता, अंतराळ ही अंतिम किंवा निर्णायक युद्धभूमी आहे, हे स्पष्टपणे सिद्ध होते. अंतराळावर ज्या देशाचे वर्चस्व असेल, तोच यापुढे भूमीवरील युद्धात सरस ठरणार आहे. सामरिक अंतराळ हा अलिकडच्या काळातील युद्धांचा कणा आहे. या अंतराळ वर्चस्वामुळे कोणत्याही सैन्याला संघर्ष करण्यासाठी ‘स्ट्रॅटेजिक डेफ्थ’ उपलब्ध होते. त्यामुळे प्रत्येक देश आज या वर्चस्वाचा विचार करत आहे.

‘स्वायत्त’ युद्धाची संकल्पना

सध्याच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान विकासाच्या काळात युद्धाचे स्वरुपही अमूलाग्र परावर्तित झाले आहे. भविष्यातील युद्धे ही केवळ बंदुका आणि तोफांच्या साहाय्याने नव्हे, तर संगणकाच्या साहाय्याने डिजिटल बोर्डांवर केली जातील. अशाप्रकारे युद्धांचा प्रवास पारंपरिक युद्ध या स्थितीकडून ‘मोझाईक वॉर’पर्यंत पोहचला आहे. हे प्रत्येक देशाला जाणून घ्यावे लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रांना अवकाश तंत्रज्ञान विकासासाठी अधिक गुंतणूक करावी लागेल, चीन हा देश अशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर करत आहे. या क्षेत्रात चीनने मोठी प्रगती केली असून तो अवकाशातून मिळविल्या जाणाऱ्या माहितीच्या क्षेत्रात आज अमेरिकेच्या यंत्रणांवर अवलंबून नाही. त्याने स्वत:च्या बळावर अवकाश विकास केलेला आहे.

युद्धनीतीवर मोठा परिणाम

उपग्रहांनी पाठविलेली छायाचित्रे आणि माहिती यांच्या आधारे युद्धात व्यूहरचना केली जाते. तसेच हालचाली (नॅव्हिगेशन) आणि संपर्क ठेवण्याच्या क्षमतेत मोठी प्रगती साध्य झाली आहे. गुप्त महिती मिळविणे. शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, युद्धक्षेत्राची टेहळणी करणे आदी बाबी पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या आणि अचूक प्रकारे शक्य होत आहेत. त्यामुळे युद्धे झटपट संपविण्यासाठी आणि अचूक हल्ले करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. हल्ला अधिक वेगाने करता येतो. सध्याच्या काळात अचूकता आणि सखोलता यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

हल्ला आणि प्रत्युत्तर दोन्हींसाठी उपयुक्त

आज अवकाश तंत्रज्ञान शत्रूवर हल्ला करणे आणि शत्रूच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देणे, या दोन्ही कृतींसाठी अत्यावश्यक ठरत आहे. त्यामुळे अवकाशातून युद्ध करण्याच्या क्षमतेत शत्रूवर मात करणे हे अत्याधिक महत्त्वाचे बनले असून त्यामुळेच अवकाश तंत्रज्ञान विकासाकडे अधिक लक्ष देणे क्रमप्राप्त बनले आहे.

भारतासाठी काय आवश्यक...

युद्धांमधील अंतराळाचे अटळ महत्त्व लक्षात घेता भारताने ‘स्पेस डोमेन अवेअरनेस’वर भर दिला पाहिजे. आपल्या देशाच्या संरक्षणामध्ये हे धोरण ही प्रथम पायरी ठरेल. युद्धनीतीचा विस्तार आता भूमी, आकाश आणि सागर यांच्याप्रमाणेच अंतराळ, सायबर तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक साधन विकास यांच्यापर्यंत करावयास हवा. यावर अधिक भर देण्यात यावा आणि गुंतवणूक वाढविण्यात यावी.

चीन आणि पाकिस्तान युती

आज अंतराळ क्षेत्रात चीन आणि पाकिस्तान यांच्यात युती झालेली दिसते. चीन आपल्या अंतराळ आणि सायबर तंत्रज्ञान विकासाचा लाभ पाकिस्तानला मिळवून देत आहे. त्यामुळे भारतासमोर मोठे आव्हान उभे आहे. त्यामुळे भारताने आपल्या सर्व अंतराळ क्षेत्रांचे एकत्रीकरण करणे आणि पीएनटी, आयएसआर आणि कम्युनिकेशन या अवकाश यंत्रणांना एकमेकांशी जोडणे अत्यावश्यक झाले आहे.

अंतराळ रण आता नवे नाही

अंतराळाचे संशोधन आणि त्याचा युद्धांसाठी उपयोग या बाबी आता इतक्या प्रगत झाल्या आहेत, की त्यांचे नवखेपण संपले आहे. युद्धांमध्ये आता या बाबी नियमित झाल्या असून त्या आत्मसात करणे भारतासारख्या मोठ्या देशासाठी अपरिहार्य ठरले आहे. त्यामुळे अंतराळ किंवा अवकाश क्षेत्र ही यापुढे एक स्थायी रणक्षेत्र म्हणून समोर आले आहे. याचा विचार रणनिती निर्धारित करताना झालाच पाहिजे, अशी परिस्थिती आहे. भारताने ती लक्षात घेऊन आपले धोरण ठरवणे हिताचे ठरेल. अंतराळ क्षेत्राकडे दुर्लक्ष झाल्यास त्याची मोठी किंमत भोगावी लागणार हे देखील निश्चित मानले पाहिजे. तसे पहिल्यास पूर्वीपासूनच अवकाशाचा किंवा अंतराळाचा उपयोग भूमीवरील सेनांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि हालचालींसाठी माहिती पुरविण्यासाठी होतच आहे. अवकाशात सोडलेल्या उपग्रहांकडून भूमीवरील सेनांसाठी गुप्त माहितीही पुरविली जात आहे. तथापि, आता त्याच्याही पुढे जाऊन प्रत्यक्ष अंतराळाचाच उपयोग रणक्षेत्र म्हणून होऊ लागला आहे. याची जाणीव ठेवून आपली रणनिती निर्धारित केल्यास भारताला कोणत्याही बाजूकडून धोका राहणार नाही, हे निश्चित मानावयास हवे.

एक सर्वंकष दृष्टीकोन

एकंदरीत, या पुस्तकात निवृत्त ले. ज. पी. जे. एस. पन्नू यांनी युद्धे आणि अवकाश क्षेत्र यांच्यासंबंधीचा सर्वंकष दृष्टिकोन अत्यंत ओघवत्या भाषेत आणि प्रभावीपणे मांडला आहे. वास्तविक हा विषय तांत्रिक आणि किचकट स्वरुपाचा असला, तरी तो सोप्या भाषेत सर्वसामान्यांच्याही लक्षात येईल अशा पद्धतीने मांडला गेला आहे.

- मेजर जनरल जगतबीर सिंग

पुस्तक - तारामंडल संग्राम, स्पेस कॉन्स्टेलेशन्स अॅट वॉर

लेखक - निवृत्त लेफ्टनंट जनरल पी. जे. एस. पन्नू

प्रकाशक - ब्ल्यूवन इंक प्रायव्हेट लिमिटेड.

अवकाशात भारताचा ‘सामरिक डोळा’ तैनात

‘ईओएस-05’ भू-प्रतिबिंबन उपग्रहाची देशावर नजर

जन्माष्टमीच्या दिवशी म्हणजेच शुक्रवार, 4 सप्टेंबर रोजी भारताने आपल्या अंतराळ प्रवासात आणखी एका अध्यायाची भर घातली. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून शुक्रवारी पहाटे 2 वाजून 55 मिनिटांनी जीएसएलव्ही एफ-17 रॉकेटने प्रक्षेपण तळावरून उ•ाण घेत ‘ईओएस-05’ या भू-प्रतिबिंबन (जियो-इमेजिंग) उपग्रहाला त्याच्या निर्धारित कक्षेत यशस्वीरित्या स्थापित केले. या उ•ाणाच्या माध्यमातून इस्रोने इतिहास रचला आहे. भू-प्रतिबिंबन उपग्रहाचे आयुष्य नऊ वर्षे असल्याचे इस्रोचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी जाहीर केले आहे. तसेच त्यांनी हा ‘हेरगिरी करणारा उपग्रह’ असल्याच्या अटकळी फेटाळून लावल्या. श्रीहरिकोटा येथून झालेले हे 107 वे प्रक्षेपण आणि जीएसएलव्हीची 19 वी मोहीम ठरली.

‘ईओएस-05’ हा देशाचा पहिला भू-प्रतिबिंबन म्हणजेच पृथ्वीची छायाचित्रे घेण्याची क्षमता असलेला टेहळणी उपग्रह आहे. ‘अवकाशातील डोळा’ म्हणून ओळखला जाणारा हा उपग्रह सामरिक माहिती, रिअल-टाइम प्रतिमा पुरवणार आहे. तसेच देशाच्या सीमांवर 24 तास बारकाईने लक्ष ठेवेल. चक्रीवादळे, पूर व वणव्यांविषयी अचूक माहिती देईल. इतकेच नाही तर हा उपग्रह देशाला कृषी आणि आपत्ती व्यवस्थापनासारख्या क्षेत्रांमध्येही मदत करणार असल्याने भविष्यात अवकाश संशोधनात त्याचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे. या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण हे अंतराळ संस्थेचे 2026 मधील पहिले मोठे यश आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, 12 जानेवारी रोजी, 16 उपग्रह घेऊन जाणाऱ्या पीएसएलव्ही-सी62 रॉकेटच्या प्रक्षेपणाच्या तिसऱ्या टप्प्यात बिघाड झाल्यामुळे रॉकेटला उपग्रहांना त्यांच्या नियोजित कक्षेत स्थापित करता आले नव्हते.

  1. 2,300 किलोपेक्षा जास्त वजन असलेला ईओएस-05 हा उपग्रह, ‘जीएसएलव्ही’द्वारे वाहून नेलेला सर्वात जड उपग्रह आहे. हा उपग्रह भारताच्या सीमांवर होणाऱ्या सूक्ष्म हालचाली टिपण्यास उपयुक्त आहे. तसेच अनेक प्रकारची सामरिक आणि नागरी गुप्त माहिती देण्यास सक्षम आहे.
  2. अनेक जियो-इमेजिंग उपग्रह पृथ्वीच्या निम्न कक्षेत कार्यरत असले तरी, ईओएस-05 उपग्रह सुमारे 36,000 किलोमीटर उंचीवर भूस्थिर कक्षेत स्थापित करण्यात आला आहे. या कक्षेत उपग्रह पृथ्वीच्या परिवलनाशी समक्रमित झाल्यामुळे तो एकाच ठिकाणी स्थिर राहणार आहे.
  3. ईओएस-05 चे वर्णन बहु-बँड ऑपरेटिंग क्षमता असलेला एक अद्वितीय आणि एकमेवाद्वितीय उपग्रह असे केले जाते. रचना, साहित्य आणि क्षमतांच्या बाबतीत हा एक गुंतागुंतीचा उपग्रह आहे. त्यात वेगाने हालचाल करणारे अत्याधुनिक अँटेना आहेत.
  4. ईओएस-05 हा उपग्रह दृश्यमान, इन्फ्रारेड, मल्टीस्पेक्ट्रल आणि हायपरस्पेक्ट्रल बँडमध्ये प्रगत छायाचित्रे घेण्यास सक्षम आहे. भूस्थिर कक्षेत हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग क्षमता प्रदान करणारा हा जगातील पहिला उपग्रह ठरला आहे.
  5. हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग म्हणजे एक प्रगत तंत्रज्ञान असून ते विद्युत चुंबकीय वर्णपटावर प्रकाशाला शेकडो तरंगलांबी बँडमध्ये विभागून माहिती गोळा करतो. या उपग्रहाद्वारे संपूर्ण भारत भूमीची प्रत्येक 30 मिनिटांमध्ये छायाचित्रे काढली जातील. तसेच वेळप्रसंगी प्रत्येक 5 मिनिटांनी अपडेट्स मिळू शकतील.

Advertisement
Tags :

.