For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सपा नेते आझम खान दोषी

06:23 AM May 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
सपा नेते आझम खान दोषी
Advertisement

जिल्हाधिकाऱ्यांबाबत अपमानजनक टिप्पणी भोवली

Advertisement

वृत्तसंस्था/ रामपूर

रामपूरच्या खासदार-आमदार न्यायालयाने समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांच्या विरोधात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांविषयी अपमानजनक टिप्पणी केल्याबद्दल न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे. आझम खान यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची आणि 5,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सहा वर्षांनंतर न्यायालयाने या प्रकरणात आपला निकाल दिला आहे.

Advertisement

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांविषयी अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप आझम खान यांच्यावर होता. त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला ‘पगारदार माणूस’ असे संबोधत त्याच्याकडून बूट स्वच्छ करून घेईन असे म्हटले होते. ही संपूर्ण घटना 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान रामपूरच्या भोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. आझम खान यांच्या वक्तव्यामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली हेती. त्यावेळी अंजनेय कुमार सिंह हे रामपूरचे जिल्हाधिकारी होते. ते आता मोरादाबादचे आयुक्त आहेत.

आझम खान यापूर्वीच रामपूर तुरुंगात कैद

आझम खान आधीच रामपूर तुरुंगात कैद आहेत. शनिवारी न्यायालयाच्या निर्णयादरम्यान त्यांना तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीशी जोडण्यात आले होते. यापूर्वी बनावट पॅन कार्ड बनवल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेमुळे आझम खान यांना आपली विधानसभेची जागा गमवावी लागली होती. आझम खान हे समाजवादी पक्षाच्या सरकारमधील एक वजनदार कॅबिनेट मंत्री होते. ते दोनवेळा खासदार आणि नऊ वेळा आमदार राहिले आहेत.

Advertisement

.