सावळज मंडलात ७५ टक्के क्षेत्रावर पेरणी
सावळज / रमेश मस्के :
चालू वर्षी पाऊस लवकरच सुरू झाल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र सावळज कृषी मंडळात १ जुलैपर्यंत ७५ टक्के म्हणजे ७८६७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या दीड महिन्यात तासगाव तालुक्यात सर्वाधिक सावळज मंडळात ३८२ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे अद्याप पाण्याखाली असलेल्या शेतीत पेरणीसाठी विलंब होत आहे.
सावळज मंडळात १४ मे पासुनच मान्सून पुर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. सातत्याने होत असलेल्या पावसामुळे मशागतीची कामे खोळंबली होती. खरीप हंगामासाठी शेत नांगरणी, कोळपणी, फण मारणे, शेणखत मिसळणे यासह इतर मशागतीची कामे केली जातात. पण पावसामुळे शेतात पाणी साचुन राहिल्याने शेताला वापसाच मिळत नव्हता. मात्र जुनच्या शेवटच्या पंधरवड्यात पावसाची काहीशी उघडीप मिळताच पेरणीला गती आली आहे.
- सावळज मंडळात ७५ टक्के क्षेत्रावर पेरणी
सावळज कृषी मंडळात खरीप हंगामासाठी १० हजार ४६६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी उद्दिष्ट असून त्यापैकी जुनच्या पहिल्या पंधरवड्यात केवळ ९५४ हेक्टर ९.११ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली होती. मात्र जुनच्या शेवटच्या पंधरवड्यात पावसाने काहीशी उघडीप दिल्याने मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत. खरीप हंगाम ज्वारीसाठीच्या ६२६६ हेक्टर क्षेत्रापैकी ४७१२ हेक्टर पेरणी झाली आहे. तर मका लागवडीच्या १०३४ क्षेत्रापैकी १०१६, भुईमूगच्या १३३१ क्षेत्रापैकी ९९८, उडीद ५५० क्षेत्रापैकी ४५३, सोयाबीनच्या ७४६ क्षेत्रापैकी ४०९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तसेच तुर १२८, मुग १४८, सुर्यफुल ४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. याबाबत कृषी विभागाने माहिती दिली आहे. ज्या रानात पाणी साचते अशा शेतातील पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत.
- सावळज मंडळात सर्वाधिक ३८२ मिमी पाऊस
गेले दीड महिना सावळज मंडळात जोरदार पाऊस होत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात सावळज मंडळात तब्बल २४३.९ मिमी पाऊस पडला होता तर जुनच्या पहिल्या पंधरवड्यात ९०.८ मिमी पावसाची नोंद झाली होती. तर जुन महिन्यात सरासरीपेक्षा जास्त १३८.७ मिमी पाऊस झाला आहे. गेल्या दीड महिन्यात ३८२.६ मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे तासगाव तालुक्यात सर्वाधिक पाऊस सावळज मंडळात झाला आहे.