खरिप हंगामात 7 लाख हेक्टरात पेरणी पूर्ण
सर्वंच पिकांना पोषक वातावरण : समाधानकारक पावसाचा परिणाम
► प्रतिनिधी / बेळगाव
यंदाच्या खरिप हंगामात 7.42 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी 7.10 लाख हेक्टर क्षेत्रातील पेरणी पूर्ण झाली आहे. समाधानकारक पावसामुळे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित पेरणी सद्यस्थितीत सुरू आहे. यंदा जून आणि जुलैच्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे पेरणीचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण झाले आहे. अशी माहिती कृषी खात्याने दिली आहे.
जिल्ह्यात खरिप हंगामात भात, सोयाबीन, भुईमूग, कापूस, सूर्यफूल, ऊस मका, मूग, उडीद, तूर, ज्वारी आदी पिकांची पेरणी व लागवड केली जाते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा एकूण पेरणीचे क्षेत्रही वाढले आहे. गतवर्षी पावसाअभावी पेरणीच्या क्षेत्रात घट झाली होती. शिवाय पिकांनाही फटका बसला होता. त्यामुळे सरकारने दुष्काळ जाहीर केला होता. यंदा हवामान खात्याने समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार आतापर्यंत शेतीला पूरक पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील विविध भागात पेरणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
पीक विमा योजनेला प्रारंभ
जिल्ह्यात सर्वाधिक उसाचे क्षेत्र आहे. त्या पाठोपाठ भात, सोयाबीन, भुईमूग, मका, सूर्यफूल, कापूस, आदींची पेरणी केली जाते. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी कृषी खात्याने पीक विमा योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी वेळेत विमा भरून पिकांना संरक्षण द्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
तात्पुरती कृषी केंद्रे सुरू
शेतकऱ्यांना बी बियाणी, कीटकनाशके आणि रासायनिक खते वेळेत उपलब्ध व्हावीत, यासाठी रयत संपर्क केंद्र, कृषी पत्तीन संघ आणि तात्पुरती कृषी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. याठिकाणी शेतकऱ्यांना बि बियाणे आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात 35 रयत संपर्क केंद्र, 1 हजारहून अधिक कृषीपतीन संघ आणि 138 तात्पुरती कृषी केंद्रे निर्माण करण्यात आली आहे. याठिकाणी सुविधा दिल्या जात आहेत.
पूरक वातावरणामुळे वेळेत पेरणीचे काम
जिल्ह्यात 7.42 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी आतापर्यंत 7.10 लाख हेक्टर क्षेत्रातील पेरणी पूर्ण झाली आहे. आतापर्यंत समाधानकारक पावसाची नोंदही झाली आहे. पूरक वातावरणामुळे वेळेत पेरणीचे काम झाले आहे. शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते पुरविण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील पेरणी पूर्ण झालेली क्षेत्र हेक्टरात
पिके पेरणी केलेले क्षेत्र (हेक्टरात)
सोयाबीन 113713
ज्वारी 113016
भात 41077
भुईमूग 22452
तूर 13252
मूग 39892
उडीद 17574
कापूस 21800
ऊस 309115