श्री देवी लईराईचे सोवळे व्रत सुरु
अमावस्येपासून सोवळे व्रत पाळणारे धोंडगण सहभागी : रविवारपासून तीन दिवशीय सोवळे व्रत
डिचोली : शिरगाव येथील प्रसिद्ध श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवाची तयारी जोरदारपणे सुरू असतानाच या जत्रेत अनन्यभावनेने सेवा बजावणाऱ्या व्रतस्थ धोंडगणांच्या पाच दिवसीय सोवळे व्रताला आज शुक्रवार दि. 17 एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. तीन दिवसीय व्रत रविवार 19 एप्रिलपासून सुरू होणार आहे. या व्रताच्या निमित्ताने सर्व धोंडगणांची स्थळे धोंडगणांच्या उपस्थितीने गजबजू लागली असून भक्तीमय व उत्साहाचे वातावरण सर्वत्र पसरले आहे.
या जत्रेत सहभागी होणारे देवीचे संपूर्ण गोव्यात विखुरलेले हजारोंच्या संख्येने धोंडगण गेल्या गुढीपाडव्यापासून शाकाहार पाळून आहेत. आता या धोंडगणांच्या प्रखर सोवळे व्रताला व भक्तिमय सेवेला आज शुक्रवापासून सुऊवात होणार आहे. जत्रोत्सवात ‘एकवत’ हे व्रत पाच दिवस पाळणारे धोंडगण शुक्रवारपासूनच आपापल्या पारंपरिक तळावर दाखल होणार आहेत. काही धोंडगण जत्रोत्सवाच्या पाच दिवस पूर्वी येणाऱ्या अमावस्येलाच तळांवर दाखल होतात. त्यामुळे काही तळांवर काल गुरुवारी धोंडगणांनी सोवळ्या व्रताला प्रारंभ केला आहे.
त्यामुळे या तळांवर धोंडगणांचा वावर दिसून येऊ लागला आहे. या सोवळे व्रतासाठी तळांची साफसफाई, मंडप उभारणी, शेण सारवण व इतर सर्व गोष्टी करून संपूर्ण तळ सूचिर्भूत करून घेतल्यानंतर आपल्या वार्षिक परंपरेप्रमाणे व्रताला सुऊवात केली आहे. या तळांवर आवश्यक असलेले सामानही आणण्यात आले आहे. तीन दिवस हे सोवळे व्रत पाळणारे धोंडगण रविवार दि. 19 एप्रिलपासून तळावर ऊजू होणार आहेत.
त्यामुळे सर्व धोंडगणांची स्थळे रविवारपासून धोंडगणांनी भरून निघणार व सर्वत्र देवीचा अखंड जयघोष, नामस्मरण असे भक्तीमय व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. देवीच्या अनन्य भावनेने धोंडगण म्हणून नव्याने ऊजू होणाऱ्या धोंडगणांना सक्तीने पाच वर्षे हे सोवळे व्रत पाळावे लागते. पाच वर्षे झाल्यानंतर हे धोंडगण दरवर्षी तीन दिवसांचे सोहळे व्रत पाळू शकतात. परंतु काही धोंडगण दरवर्षी पाच दिवसांचे व्रत पाळतात व आपापल्या पारंपरिक स्थळांवर ऊजू होतात.