For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दक्षिणवाडा समुद्रकिनारी गणेश विसर्जनाचा मार्ग सुकर; ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर यांच्या विशेष प्रयत्नांतून चिरेबंदी पायऱ्यांची उभारणी

दक्षिणवाडा समुद्रकिनारी गणेश विसर्जनाचा मार्ग सुकर  ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर यांच्या विशेष प्रयत्नांतून चिरेबंदी पायऱ्यांची उभारणी
Advertisement

आचरा : दक्षिणवाडा येथील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणारी समुद्रकिनारी उतरण्याची अडचण अखेर दूर झाली आहे. समुद्रकिनारी जाण्यासाठी चिरेबंदी दगडी पायऱ्यांची उभारणी करण्यात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, आगामी गणेशोत्सवात गणेशमूर्ती विसर्जनाचा मार्गही अधिक सुरक्षित व सुकर होणार आहे.

Advertisement

दक्षिणवाड्यातील नागरिकांना समुद्रकिनारी जाण्यासाठी उंचसखल व अवघड मार्गाचा सामना करावा लागत होता. विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात गणेशमूर्ती घेऊन समुद्रकिनारी उतरताना भाविकांची मोठी गैरसोय होत होती. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना या मार्गावरून जाताना विशेष त्रास सहन करावा लागत होता.

ही समस्या लक्षात घेऊन पिरावाडी ग्रामपंचायतीचे सदस्य मुजफ्फर मुजावर यांनी पुढाकार घेतला. त्यांनी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्याशी चर्चा करून ग्रामपंचायतीच्या निधीची प्रतीक्षा न करता स्वखर्चाने समुद्रकिनारी उतरण्यासाठी आरामदायी व सुरक्षित अशा चिरेबंदी दगडी पायऱ्यांचे काम करून घेतले.

Advertisement

या पायऱ्यांमुळे दक्षिणवाड्यातील नागरिकांना समुद्रकिनारी जाणे अधिक सोपे झाले आहे. तसेच गणेश विसर्जनाच्या वेळी गणेशमूर्ती घेऊन समुद्रकिनारी उतरताना होणारी गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

‘पिरावाडीचा विकास हाच आपला ध्यास’ हे केवळ बोलण्यातून नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देत मुजफ्फर मुजावर विविध विकासकामांसाठी सातत्याने पुढाकार घेत आहेत. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडविण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेण्याच्या त्यांच्या भूमिकेचे दक्षिणवाड्यातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

दरम्यान, या लोकहिताच्या उपयुक्त कामाबद्दल समस्त तरुण संघ, दक्षिणवाडा यांच्या वतीने मुजफ्फर मुजावर यांचे आभार मानण्यात आले.

Advertisement
Tags :

.