For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साऊथगेटकडून व्यवस्थापकपदाचा त्याग

06:03 AM Jul 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
साऊथगेटकडून व्यवस्थापकपदाचा त्याग
Advertisement

वृत्तसंस्था/लंडन

Advertisement

2024 च्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेत उपविजेतेपद मिळविणाऱ्या इंग्लंड फुटबॉल संघाचे व्यवस्थापक गॅरेथ साऊथ्गेट यांनी आपल्या पदाचा त्याग केला आहे. साऊथगेट हे इंग्लंड फुटबॉल संघाचे तब्बल 8 वर्षे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील गेल्या रविवारी झालेल्या अटितटीच्या अंतिम सामन्यात स्पेनने इंग्लंडचा 2-1 अशा गोल फरकाने पराभव करुन अजिंक्यपद पटकाविले. साऊथगेट यांच्या व्यवस्थापकपदाच्या कराराची मुदत वर्षअखेरीस संपणार आहे. तत्पूर्वीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा इंग्लंड फुटबॉल फेडरेशनकडे दिला आहे. आपल्या वैयक्तिक फुटबॉल कारकिर्दीत  इंग्लंड संघाकडून खेळण्याचे तसेच या संघाच्या व्यवस्थापनाच्या जबाबदारीची संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल साऊथगेट याने इंग्लंड फुटबॉल फेडरेशनचे आभार मानले आहे. 2016 साली इंग्लंड फुटबॉल संघाच्या व्यवस्थापकपदी साऊथगेट यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडच्या फुटबॉल संघाने 2018 च्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यफेरीपर्यंत मजल मारली. तसेच त्यांनी सलग दोनवेळा युरो चषक फुटबॉल स्पर्धेत इंग्लंडला अंतिम फेरीपर्यंत नेले. 1966 नंतर इंग्लंडच्या फुटबॉल संघाला एकही प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकता आलेली नाही. 1966 साली इंग्लंडच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा जिंकली होती. इंग्लंडच्या फुटबॉल क्षेत्राचा पाया मजबूत करण्यामध्ये साऊथगेट यांचे योगदान आजही मोलाचे असल्याचे एफएचे प्रमुख कार्यकारी मार्क बुलिंगहॅम यांनी म्हटले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.