मालवाहतुकीतून नैर्त्रुत्य रेल्वेची रेकॉर्ड ब्रेक कमाई
बेळगाव : नैर्त्रुत्य रेल्वेने मालवाहतुकीद्वारे उत्पन्नात कमालीची वाढ केली आहे. सप्टेंबर 2025 मध्ये 4.17 लाख टन साहित्याची वाहतूक केली असून यातून 427 कोटी रुपये महसूल मिळाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 36 टक्क्यांनी महसूल वाढल्याने नैर्त्रुत्य रेल्वेने समाधान व्यक्त केले आहे. तसेच प्रवासी वाहतुकीद्वारे 14 लाख प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून 282 कोटी रुपये महसूल जमा झाला आहे. प्रवासी वाहतुकीपेक्षा मालवाहतुकीद्वारे महसुलात वाढ होत असल्याने नैर्त्रुत्य रेल्वेने त्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. सिमेंट, अन्नधान्य, खडी, खत, चारचाकी वाहने यांच्या वाहतुकीतून महसूल मिळविला जात आहे. मागील वर्षात 0.74 मेट्रिक टन कोळशाची वाहतूक करण्यात आली आहे. याबरोबरच विविध स्टील उद्योगांना कच्चामाल पाठविण्यात आला आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली आहे. सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव, तसेच नवरात्रोत्सव असल्यामुळे 14 लाख लोकांनी रेल्वेद्वारे प्रवास केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत प्रवाशांची संख्या वाढली असल्याने रेल्वेने समाधान व्यक्त केले आहे.