‘आठ दिवसांत दक्षिण सोलापूर दुष्काळग्रस्त जाहीर करा’; मंद्रूपमध्ये ठाकरे गटाचा रास्ता रोको; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारविरोधात घोषणाबाजी
मंद्रूप / प्रतिनिधी : अभिजीत जवळकोटे : दक्षिण सोलापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सोमवारी (दि. 21) मंद्रूप येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. येत्या आठ दिवसांत दक्षिण सोलापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनानंतर नायब तहसीलदार अश्विनी थोरात यांना निवेदन देण्यात आले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख सुषमा अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख शरणराज केंगनाळकर आणि दक्षिण सोलापूर तालुकाप्रमुख आनंदकुमार थोरात यांनी केले. शेतकरी, शिवसैनिक आणि पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
निवेदनात दक्षिण सोलापूर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने खरीप पिकांवर परिणाम झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य आणि आश्लेषा या नक्षत्रांच्या कालावधीतही अपेक्षित पाऊस झाला नसल्याने अनेक भागांत पिकांची अवस्था बिकट झाली आहे. पिकांना पाण्याची आवश्यकता असताना जनावरांचा चारा, पिण्याचे पाणी, शेतीसाठी केलेली गुंतवणूक आणि बँक कर्जाची परतफेड यांसारखे प्रश्नही गंभीर झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.
वाढती महागाई तसेच औषधे, बियाणे आणि खतांच्या वाढलेल्या किमतींमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्याचेही आंदोलकांनी सांगितले. पावसाची तूट कायम राहिल्यास पिके, पशुधन आणि शेतमजुरांसमोरील संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
आंदोलनादरम्यान ‘येत्या आठ दिवसांत दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खुर्ची खाली करा’ आणि ‘शेतकरी बांधवांना न्याय द्या’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या आंदोलनास जिल्हा सहसंपर्कप्रमुख दत्ता माने, जिल्हाप्रमुख शरणराज केंगनाळकर, तालुकाप्रमुख आनंद थोरात, युवा सेना जिल्हाप्रमुख रमेश चौगुले, युवा सेना तालुकाप्रमुख संदीप मेंडगुदले यांच्यासह चिरंजीव जाधव, खंडू सलगरकर, विश्वजीत चौगुले, विधानसभा प्रमुख महंमद मुलानी, शिवा माळी, राजाभाऊ कुसेकर, महेश पवार, दयानंद कोळी, रवि डोके, आयुच्युत बाबळे, धर्मराज केंगनाळकर, राजू दुलंगे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
शासनाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील परिस्थितीची तातडीने दखल घेऊन आठ दिवसांत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.