तिरंदाजीत दक्षिण कोरियन महिलांना सलग दहावे सुवर्ण
वृत्तसंस्था/पॅरिस
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत द. कोरियाच्या महिला तिरंदाजपटूंनी सांघिक तिरंदाजी प्रकारात सुवर्ण पदकावर आपले नाव कोरताना कडव्या चीनचे आव्हान संपुष्टात आणले. द. कोरियाचे महिलांच्या सांघिक तिरंदाजी प्रकारातील हे सलग दहावे सुवर्ण पदक आहे.
सुवर्ण पदकासाठी द. कोरिया आणि चीन यांच्यात अंतिम लढत चुरशीची झाली. निर्धारित वेळेमध्ये दोन्ही संघ समान गुण मिळविल्याने शुट ऑफचा अवलंब करण्यात आला. शुट ऑफमध्ये सुध्दा दोन्ही संघ पुन्हा बरोबरीत राहिल्याने पंचांनी मॅग्निफाईन ग्लासचा वापर करत निरीक्षण केले. त्यामध्ये द. कोरियाचे महिला तिरंदाजपटू जीऑन हून यंग आणि लिम हेयॉन यांनी आपल्या शॉटवर 9 ऐवजी 10 गुण मिळविले. त्यामुळे द. कोरियाने शुटऑफमध्ये 29.27 अशा गुणांनी तसेच 5-4 असा सर्वंकश विजय चीनवर मिळवून सुवर्णपदक हस्तगत केले. या क्रीडा प्रकारात द. कोरियाने सुवर्ण, चीनने रौप्य तर मेक्सीकोने नेदर्लंडस्चा पराभव करत कास्यपदक घेतले.