दक्षिण कोरिया, जपान उपांत्य फेरीत
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
रविवारी येथे सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत बांगलादेश आणि चीनविरुद्ध अनुक्रमे 5-0 आणि 2-2 असा बरोबरीचा सामना नोंदवल्यानंतर दक्षिण कोरिया आणि जपानने उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवली.
यजमान आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता भारत आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता मलेशिया यांनी तीनही सामने जिंकून उपांत्य फेरीत आपले स्थान आधीच निश्चित केले होते. दिवसाच्या पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियाने बांगलादेशचा 5-0 असा धुव्वा उडवून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. दक्षिण कोरिया सध्या चार सामन्यांपैकी दोन सामने जिंकून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. डाइन सोनने (17 व्या, 32 व्या, 51 व्या मिनिटाला) मैदानी प्रयत्नांतून दक्षिण कोरियासाठी हॅट्ट्रिक साधली, तर ग्यूनवू पार्कने (7 व्या, 34 व्या मिनिटाला) पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले. दक्षिण कोरियाचा शेवटचा राऊंड रॉबिन सामना सोमवारी भारताविरुद्ध होईल.
जपानने शेवटच्या क्षणी पेनल्टी कॉर्नरवर गोल स्वीकारल्यामुळे चीनी संघासोबत सामना 2-2 असा बरोबरीत सोडवला. आठव्या मिनिटाला जियालियांग झांगने केलेल्या मैदानी गोलमुळे चीनने आघाडी घेतली होती, पण 48 व्या मिनिटाला कर्णधार रायकी फुशिशिमाने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून जपानला बरोबरी साधून दिली. काही सेकंदांनंतर, युमा नागाईने मैदानी प्रयत्नातून गोल करून जपानला आघाडी मिळवून दिली. पण चीनने धीर सोडला नाही आणि सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला बेनहाई चेनने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून बरोबरी साधली. पण ही बरोबरी चीनला जपानचा उपांत्य फेरीतील प्रवेश रोखण्यासाठी पुरेशी नव्हती.
