दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांची बदली
अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांच्याकडे ताबा
पणजी : दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांची गोवा पोलिस मुख्यालयात बदली अचानकपणे करण्यात आली आहे. त्यांच्या जागी टिकम सिंग वर्मा यांनी दक्षिण गोव्याचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे. सुनीता सावंत यांना 2022 मध्ये उपअधीक्षक पदावरून अधीक्षकपदी बढती मिळाल्यानंतर 2024 फेब्रुवारीमध्ये त्यांची दक्षिण गोवा अधीक्षक म्हणून नियक्ती करण्यात आली होती. तत्कालीन दक्षिण गोव्याचे अधीक्षक अभिषेक धनिया यांची दिल्लीला बदली झाल्यानंतर पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांना दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. दक्षिण गोवा अधीक्षकपद हे आयपीएस केडरचे आहे.
परंतु, अनेक वर्षांनंतर या पदावर गोव्यातील पोलिस अधिकारी सुनीता सावंत यांची त्यांच्या कर्तृत्वामुळे वर्णी लागली होती. मात्र त्यांचा कार्यकाळ संपण्याअगोदरच त्यांची बदली करण्यात आली आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनीता सावंत यांनी सोमवारी रात्री आदेश येण्यापूर्वीच आपण आपले कार्यालय सोडत असल्याचे पोलिस खात्याला कळवले. त्यानंतर लगेचच त्यांच्या बदलीचा आदेश आला आणि या पदाचा ताबा टीकम सिंग वर्मा यांच्याकडे देण्यात आला. दक्षिण गोव्यातील काही आमदारांशी सुनीता सावंत यांच्याशी विविध गोष्टींवरून खटके उडत होते. याबाबत त्यांनी सावंत यांच्याविरोधात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे तक्रारही केली होती. त्यातूनच सावंत यांची बदली झाल्याची चर्चा पोलिस खात्यात सुरू आहे.