For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाची निवडणूक तयारीला गती; 12 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

11:27 AM Sep 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाची निवडणूक तयारीला गती  12 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती
Advertisement

मडगाव : दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने आगामी निवडणुकीच्या तयारीला वेग दिला असून, विविध निवडणूकविषयक कामांसाठी सुमारे 12 हजार कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एग्ना क्लीटस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली.

Advertisement

बैठकीनंतर बोलताना क्लीटस यांनी सांगितले की, भरारी पथकांसह विविध विशेष पथकांमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी पूर्ण झाली असून, प्रशासकीय पथकांकडून स्टॅटिक सर्व्हलन्स टीम्स निश्चित करण्याचे काम सुरू आहे. निवडलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहे.

मतदान केंद्रांवर मूलभूत सुविधा

मतदारांना मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. मतदान केंद्रांवरील वीज जोडण्यांमध्ये सुधारणा, स्वच्छतागृहांची उपलब्धता आणि दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प कार्यरत ठेवण्यावर भर दिला जात आहे. तसेच व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) यंत्रांशी संबंधित उर्वरित कमतरता लवकरच दूर करण्यात येणार असल्याचे क्लीटस यांनी सांगितले.

Advertisement

दरम्यान, दक्षिण गोवा जिल्ह्यात निवडणूकपूर्व तयारीच्या भाग म्हणून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या फर्स्ट लेव्हल चेकिंगची प्रक्रियाही ऑगस्टमध्ये पार पडली होती. ही प्रक्रिया आगामी 2027 विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दिव्यांग मतदारांच्या नोंदणीवरही भर

मतदार जनजागृती आणि निवडणूक सहभाग वाढविण्यासाठी SVEEP (Systematic Voters’ Education and Electoral Participation) कार्यक्रमाचाही आढावा घेण्यात आला. आतापर्यंत मतदार यादीत सुमारे 2,900 दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. आवश्यक अर्ज आणि कागदपत्रे मिळवण्यासाठी बूथस्तरीय अधिकारी संबंधित मतदारांच्या घरी भेटी देत आहेत.

याशिवाय निवडणूक निरीक्षक, देखरेख पथके आणि संबंधित अधिकाऱ्यांसाठी वाहतूक व्यवस्थापन आराखडाही तयार केला जात आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळ्यांवर तयारी सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.