दक्षिण आफ्रिकेची विजयी घोडदौड कायम
झिंबाब्वेचा पाच गड्यांनी पराभव : अष्टपैलू सिकंदर रझा सामनावीर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बलाढ्या दक्षिण आफ्रिकेने टी-20 विश्वचषक पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेत आपली विजयी घोडदौड कायम राखत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील येथे रविवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने झिंबाब्वेचा 13 चेंडू बाकी ठेवून 5 गड्यांनी पराभव केला. झिंबाब्वेचा अष्टपैलू सिकंदर रझाने दर्जेदार कामगिरी केली पण आपल्या संघाला पराभवापासून तो वाचवू शकला नाही. रझाने या सामन्यात 43 चेंडूत 73 तसेच गोलंदाजीत 29 धावांत 3 गडी बाद केल्याने त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या स्पर्धेतील रविवारचा हा 51 वा सामना होता. दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत प्राथमिक फेरीतील तसेच त्यानंतर सुपर 8 फेरीतील आपले तिन्ही सामने जिंकून गट 1 मधून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
रविवारच्या सामन्यात झिंबाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झिंबाब्वेने 20 षटकात 7 बाद 153 धावा जमविल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 17.5 षटकात 5 बाद 154 धावा जमवित विजय नोंदविला.
झिंबाब्वेच्या डावामध्ये कर्णधार सिकंदर रझाने 43 चेंडूत 4 षटकार आणि 8 चौकारांसह 73 धावा झळकाविल्या. क्लाईव्ह मदांडेने 20 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 26 धावा केल्या. बेनेटने 1 षटकार आणि 1 चौकारासह 15, मेयर्सने 1 चौकारासह 11 धावा जमविल्या. इव्हान्सने 1 षटकारासह 8 धावा केल्या. झिंबाब्वेच्या डावात 6 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. झिंबाब्वेने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 45 धावा जमविताना 2 गडी गमाविले. झिंबाब्वेचे अर्धशतक 40 चेंडूत, शतक 82 चेंडूत तर दीडशतक 120 चेंडूत नोंदविले गेले. सिकंदर रझाने 29 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह अर्धशतक झळकाविले. मारूमनी आणि बेनेट यांनी 8 चेंडूत सलामीच्या गड्यासाठी 14 धावा जमविल्या. मफाकाच्या यॉर्करवर मारूमनीचा त्रिफळा उडविला. त्याने 7 धावा केल्या. त्यानंतर नॉर्त्जेने बेनेटला मार्करमकरवी झेलबाद केले. त्याने 15 धावा जमविल्या. लिन्डेने मायर्सला ब्रेव्हिसकरवी झेलबाद केले. बर्ल 5 धावावर तर मूनयोंगा 2 धावावर बाद झाले. झिंबाब्वेचा निम्मा संघ 11.4 षटकात 87 धावांत बाद झाला. त्यानंतर कर्णधार सिकंदर रझा आणि मदांडे यांनी सहाव्या गड्यासाठी 39 धावांची भर घातली. दक्षिण आफ्रिकेतर्फे मापेकाने 21 धावांत 2 बॉशने 40 धावांत 2 बळी मिळविले. तर लिन्डे, एन्गिडी, नॉर्त्जे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना सिकंदर रझाच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचे सलामीचे फलंदाज कर्णधार मार्करम आणि डी कॉक हे लवकर बाद झाले. डावातील पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सिकंदर रझाने डी कॉकला खाते उघडण्यापूर्वी झेलबाद केले. तर डावातील तिसऱ्या षटकात सिकंदर रझाने मार्करमचा 4 धावांवर त्रिफळा उडविला. रिकेल्टन आणि ब्रेव्हिस या जोडीने धावफलक हालता ठेवण्याचा प्रयत्न करताना तिसऱ्या गड्यासाठी 29 धावांची भर घातली. इव्हान्सने रिकेल्टनला झेलबाद केले. त्याने 22 चेंडूत 4 षटकारांसह 31 धावा जमविल्या. ब्रेव्हिस आणि मिलर या जोडीने पाचव्या गड्यासाठी 25 चेंडूत 50 धावांची अर्धशतकी भागिदारी केली. मुझाराबानीने मिलरला झेलबाद केले. त्याने 16 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 22 धावा जमविल्या. सिकंदर रझाने ब्रेव्हिसला बर्लकरवी झेलबाद केले. त्याने 18 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांसह 42 धावा झळकाविल्या. दक्षिण आफ्रिकेची स्थिती यावेळी 10.4 षटकात 5 बाद 101 अशी होती. स्टब्ज आणि लिन्डे यांनी सहाव्या गड्यासाठी अभेद्य 53 धावांची भागिदारी करत आपल्या संघाला 13 चेंडू बाकी ठेऊन 5 गड्यांनी विजय मिळवून दिला. स्टब्जने 24 चेंडूत नाबाद 21 तर लिनेडीने 21 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 30 धावा झळकाविल्या.
दक्षिण आफ्रिकेच्या डावात 11 षटकार आणि 6 चौकार नोंदविले गेले. दक्षिण आफ्रिकेने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 43 धावा जमविताना 3 गडी गमाविले. दक्षिण आफ्रिकेचे अर्धशतक 38 चेंडूत, शतक 62 चेंडूत तर दीडशतक 105 चेंडूत नोंदविले गेले. झिंबाब्वेतर्फे सिकंदर रझाने 29 धावांत 3 तर मुझाराबानी आणि इव्हान्स यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या संपूर्ण स्पर्धेत झिंबाब्वे संघाची कामगिरी निश्चितच दर्जेदार झाली असून त्यांनी प्राथमिक फेरीत बलाढ्या ऑस्ट्रेलिया आणि लंका यांना पराभवाचे धक्के दिले होते. पण सुपर 8 फेरीत त्यांना आपले तीनही सामने गमवावे लागले.
संक्षिप्त धावफलक - झिंबाब्वे 20 षटकात 7 बाद 153 (सिकंदर रझा 73, मदांडे नाबाद 26, बेनेट 15, मेयर्स 11, इव्हान्स 8, अवांतर 5, मफाका व बॉश प्रत्येकी 2 बळी, लिन्डे, एन्गिडी, नॉर्त्जे प्रत्येकी 1 बळी), दक्षिण आफ्रिका 17.5 षटकात 5 बाद 154 (ब्रेव्हिस 42, रिकेल्टन 31, मिलर 22, स्टब्ज नाबाद 21, लिन्डे नाबाद 30, मार्करम 4, डी कॉक 0, अवांतर 4, सिकंदर रझा 3-29, मुझाराबानी, इव्हान्स प्रत्येकी 1 बळी).