दक्षिण आफ्रिकेचा कसोटी मालिका विजय
सिमॉन हार्मेर ‘सामनावीर’ : मार्को जेनसन ‘मालिकावीर’
वृत्तसंस्था, केप्टाऊन
तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमान दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. या मालिकेतील शनिवारी येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर 176 धावांनी दणदणीत विजय मिळविला. या शेवटच्या सामन्यात 16 धावांत 6 गडी बाद करणाऱ्या हार्मेरला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. तर दक्षिण आफ्रिकेचा मार्को जेनसन ‘मालिकावीर’ ठरला. या शेवटच्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेतर्फे हार्मेर आणि रबाडा यांनी 9 गडी बाद केले.
सदर मालिका आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवली गेली. या दोन्ही बलाढ्या संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकल्याने तिसऱ्या आणि निर्णायक कसोटीपूर्वी बरोबरी साधली होती. या शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 100 धावांची आघाडी घेऊनही पराभवाला सामोरे जावे लागले. खेळाच्या शेवटच्या दिवशी हार्मेर आणि रबाडा यांच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 57.1 षटकात 111 धावांत आटोपला. तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला निर्णायक विजयासाठी 288 धावांचे आव्हान दिले होते.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 329 धावा जमविल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 429 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 387 धावा जमविल्या. रिक्लेटन आणि मुल्डेर यांची शतके तसेच अॅकरमनचे अर्धशतक महत्त्वाचे ठरले. रिक्लेटनने 12 चौकारांसह 101 तर मुल्डेरने 4 षटकार आणि 10 चौकारांसह 115 धावा जमविल्या. शुक्रवारी खेळाच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव समाप्त झाला होता.
शनिवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी मैदानावर केवळ आपली हजेरी लावली. ग्रीनने 110 चेंडूत 3 चौकारांसह 27, हेडने 3 चौकारांसह 14 तर कर्णधार कमिन्सने 1 चौकारासह 11 धावा केल्या. दहाव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या लियॉनने 57 चेंडूत 6 चौकारांसह नाबाद 33 धावा जमविल्याने ऑस्ट्रेलियाला तीन अंकी धावसंख्या गाठता आली. सकाळच्या पहिल्या सत्रातच ऑस्ट्रेलियाने 26 षटकात 7 बाद 60 धावा जमविल्या होत्या. त्यानंतर चहापानापूर्वीच त्यांचे शेवटचे चार गडी 51 धावांची भर घालत तंबूत परतले. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 12 गुण मिळाले.
रबाडाचा विक्रम
दक्षिण आफ्रिकेचा वेगवाग गोलंदाज कॅगिसो रबाडाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 बळींचा टप्पा ओलांडला. तर त्याने कसोटीत 350 बळी नोंदविले आहेत. असा पराक्रम करणारा रबाडा हा दक्षिण आफ्रिकेचा पाचवा गोलंदाज आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या शॉन पोलॉकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 823 बळी, डेल स्टीनने 697 बळी, मकाया न्तिनीने 661 बळी, अॅलन डोनाल्डने 602 बळी मिळविले आहेत. रबाडा या यादीमध्ये आता पाचव्या स्थानावर आहे.
रबाडाने कसोटी क्रिकेटमध्ये 350 बळी मिळविले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये हा टप्पा गाठणारा रबाडा हा संयुक्त तिसरा वेगवान गोलंदाज आहे. रबाडाने 75 कसोटीत 350 बळींचा टप्पा गाठला. विंडीजच्या माल्कम मार्शलने 75 कसोटीत 350 बळी नोंदविले होते. ऑस्ट्रेलियाच्या मॅकग्राने 74 कसोटीत 350 बळींचा टप्पा गाठला होता.
संक्षिप्त धावफलक - दक्षिण आफ्रिका प. डाव 329, ऑस्ट्रेलिया प. डाव 429, दक्षिण आफ्रिका दु. डाव सर्वबाद 387 (रिक्लेटन 101, मुल्डेर 115, अॅकरमन 62, स्टार्क 3-65, कमिन्स व लियॉन प्रत्येकी 2 बळी), ऑस्ट्रेलिया दु. डाव 57.1 षटकात सर्वबाद 111 (लियॉन नाबाद 33, ग्रीन 27, कमिन्स 11, हेड 14, अवांतर 16, हार्मेर 6-16, रबाडा 3-39).
