द. आफ्रिका महिला संघाचा सलग दुसरा विजय
वृत्तसंस्था / पर्ल (द. आफ्रिका)
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात द. आफ्रिका महिला क्रिकेट संघाने आयर्लंडचा 65 धावांनी पराभव करत या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली आहे. द. आफ्रिका संघातील डेन व्हॅन निकर्क तसेच टुनीक्लफ यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर हा सामना जिंकून मालिकेत वर्चस्व राखले आहे. टुनीक्लफने अर्धशतक (51) तर निकर्कने 41 धावा जमविल्या.
या दुसऱ्या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून द. आफ्रिकेला प्रथम फलंदाजी दिली. द. आफ्रिकेने 20 षटकांत 5 बाद 201 धावा जमविल्या. टुनीक्लफ आणि सुने लूस यांनी सलामीच्या गड्यासाठी 78 धावांची भागिदारी केली. टुनीक्लफने 40 चेंडूत अर्धशतक झळकविले. तिचे हे टी-20 प्रकारातील पहिलेच शतक आहे. निकर्कने 19 चेंडूत 41 धावा झोडपल्या. तिने आपल्या खेळीत 3 षटकार आणि 3 चौकार ठोकले. ट्रायोनने 7 चेंडूत 16 धावा जमविल्याने द. आफ्रिकेला 201 धावांपर्यंत मजल मारता आली. आयर्लंडच्या मॅग्युरेने 34 धावांत 3 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना आयर्लंडने आपल्या डावाला सावध सुरूवात करताना पावरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 33 धावा जमविल्या. द. आफ्रिकेच्या ट्रायोनने आयर्लंडची ही सलामीची जोडी हंटर आणि लेव्हीस यांना बाद केले. पॉलने प्रेंडरगेस्ट समवेत तिसऱ्या गड्यासाठी 76 धावांची भागिदारी केली. पॉलने 40 धावा जमविल्या. प्रेंडरग्रेस्टने डावातील शेवटच्या षटकांत आपले अर्धशतक 39 चेंडूत झळकविले. आयर्लंडने 20 षटकांत 3 बाद 136 धावा जमविल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला. द. आफ्रिकेच्या ट्रायोनने 24 धावांत 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक: द. आफ्रिका 20 षटकांत 5 बाद 201 (टुनीक्लफला 51, निकर्क 41, मॅग्युरी 3-43), आयर्लंड 20 षटकांत 3 बाद 136 ( प्रेंडरग्रेस्ट नाबाद 51, पॉल 40, ट्रायोन 2-24).