For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

द.आफ्रिका महिला संघाचा मालिका विजय

06:22 AM Apr 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
द आफ्रिका महिला संघाचा मालिका विजय
Advertisement

भारतीय महिलांवर 4-1 फरकाने मात, पाचव्या सामन्यात 23 धावांनी विजय

Advertisement

वृत्तसंस्था, बेनोनी (द.आफ्रिका)

पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान द. आफ्रिका महिला क्रिकेट संघाने भारताचा 4-1 अशा फरकाने दणदणीत पराभव केला. या मालिकेतील खेळविण्यात आलेल्या शेवटच्या सामन्यात द. आफ्रिकेने भारताचा 23 धावांनी पराभव केला. द. आफ्रिकेची कर्णधार लॉरा वूलव्हार्ट मालिकावीर आणि सामनावीर अशा दुहेरी पुरस्काराची मानकरी ठरली.

Advertisement

या शेवटच्या सामन्यात द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 155 धावा जमविल्या. त्यानंतर भारताने 20 षटकांत 8 बाद 132 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना आणि मालिका गमवावी लागली. या मालिकेत भारतीय महिला संघाची कामगिरी असमाधानकारक झाली. त्यांना केवळ एक सामना जिंकता आला.

द. आफ्रिकेच्या डावात कर्णधार वूलव्हार्टने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 56 चेंडूत 2 षटकार आणि 11 चौकारांसह नाबाद 92 धावांचे योगदान दिले. सुने लुसने 23 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 23 तर ट्रायोनने 10 चेंडूत 1 चौकारासह 12 आणि सिनालो जाफ्ताने 8 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 16 धावा जमविल्या. वूलव्हार्ट आणि लूस यांनी सलामीच्या गड्यासाठी 54 चेंडूत 75 धावांची भागिदारी केली. ही जोडी बाद झाल्यानंतर द. आफ्रिकेच्या मधल्या फळीतील फलंदाज लवकर बाद झाले. द. आफ्रिकेच्या डावामध्ये 3 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत द. आफ्रिकेने 49 धावा जमविल्या. वूलव्हार्टने 30 चेंडूत 9 चौकारांसह अर्धशतक झळकविले. 10 षटकाअखेर द. आफ्रिकेची स्थिती 1 बाद 78 अशी होती. कर्णधार वूलव्हार्टने शेवटच्या षटकातील 2 चेंडूवर सलग 2 षटकार ठोकल्याने द. आफ्रिकेला 150 धावांचा टप्पा ओलांडता आला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताच्या डावामध्ये भारती फुलमालीने 30 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 40, कर्णधार हरमनप्रित कौरने 28 चेंडूत 2 चौकारांसह 22, रिचा घोषने 15 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 25, अनुष्का शर्माने 21 चेंडूत 2 चौकारांसह 17 धावा जमविल्या. रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा यांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. भारताच्या डावामध्ये 3 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत भारताने 28 धावा जमविताना 2 गडी गमविले. 10 षटकाअखेर भारताने 3 बाद 51 धावा जमविल्या होत्या. द. आफ्रिकेतर्फे मलाबा आणि डी. क्लर्क यांनी प्रत्येकी 2 तर मार्क्स, ट्रायोन आणि खाका यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आता दोन महिन्यांच्या अंतरावर येवून ठेपली आहे. त्यामुळे भारतीय संघाला या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करण्यासाठी अधिक सरावावर भर द्यावा लागेल. या मालिकेत त्यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आला.

संक्षिप्त धावफलक : द. आफ्रिका 20 षटकांत 6 बाद 155 (वूलव्हार्ट नाबाद 92, लुस 23, ट्रायोन 12, जाफ्ता नाबाद 16, रेणूका सिंग ठाकुर आणि श्रीचरणी व दीप्ती शर्मा प्रत्येकी 2 बळी), भारत 20 षटकांत 8 बाद 132 (भारती फुलमाली 40, रिचा घोष 25, हरमनप्रित कौर 22, अनुष्का शर्मा 17, अवांतर 13, मलाबा व डी क्लर्क प्रत्येकी 2 बळी, मार्क्स, ट्रायोन आणि खाका प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.