द.आफ्रिकेने उडवला विंडीजचा धुव्वा
आयसीसी टी 20 वर्ल्डकप : सलग दुसऱ्या विजयासह आफ्रिकन संघ सेमीफायनलच्या उंबरठ्यावर :
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुरुवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा 9 गडी राखून धुव्वा उडवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने 4 गुणांची कमाई करत पॉइंट्स टेबलमध्ये थेट अव्वल स्थानी झेप घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 20 षटकांत 8 विकेट्सच्या मोबदल्यात 176 धावा केल्या. यानंतर आफ्रिकेने 16.1 षटकांत 1 विकेटच्या मोबदल्यात 177 धावांचे लक्ष्य गाठत सेमी फायनलसाठी आपली दावेदारी भक्कम केली आहे. 46 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी साकारणाऱ्या मॅरक्रमला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
प्रारंभी, आफ्रिकेने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीला बोलावले. ब्रेंडन किंग आणि शाय होप यांनी आक्रमक सुरुवात केली. पण स्थिरावल्यानंतर ते दोघेही बाद झाले. ब्रेंडन किंग 11 चेंडूत 21 धावांवर आणि शाय होप 6 चेंडूत 16 धावांवर बाद झाला. त्यानंतर शिमरॉन हेटमायर (2), रोवमन पॉवेल (9), रोस्टन चेस (2), शेरफेन रुदरफोर्ड (12), मॅथ्यू फोर्डे (11) यांनी स्वस्तात विकेट्स गमावल्या होत्या. यावेळी विंडीजने 83 धावांवरच 7 विकेट्स गमावल्या होत्या. पण जेसन होल्डर आणि रोमारियो शेफर्ड यांनी 8 व्या विकेटसाठी 89 धावांची विश्वविक्रमी भागीदारी केली. यामुळे वेस्ट इंडिजने 20 षटकात 8 बाद 176 धावांपर्यंत मजल मारली. जेसन होल्डरने 31 चेंडूत 49 धावांची खेळी केली. रोमारियो शेफर्डने 37 चेंडूत नाबाद 52 धावांचे योगदान दिले.
आफ्रिकेचा धमाकेदार विजय
177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या फलंदाजांनी संयम आणि आक्रमकता यांचा सुरेख मिलाफ साधला. एडन मार्करम आणि क्विंटन डिकॉक यांनी पहिल्या विकेटसाठी 95 धावांची भक्कम भागीदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. डिकॉकने अवघ्या 24 चेंडूमध्ये 4 षटकार आणि 4 चौकारांच्या जोरावर 47 धावांची स्फोटक खेळी केली. मात्र रोस्टन चेज याने डिकॉकला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर मार्करमने रिकेल्टनला सोबतीला घेत संघाला 16.1 षटकांत विजय मिळवून दिला. मार्करमने 46 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारासह नाबाद 82 धावांची मोलाची खेळी साकारली. रिकेल्टनने 28 चेंडूत नाबाद 45 धावांचे योगदान दिले.
संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज 20 षटकांत 8 बाद 176 (ब्रँडॉन किंग 21, शाय होप 16, रुदरफोर्ड 12, जेसन होल्डर 49, रोमारियो शेफर्ड नाबाद 52, एन्गिडी 3 बळी, रबाडा आणि बॉश प्रत्येकी 2 बळी)
दक्षिण आफ्रिका 16.1 षटकांत 1 बाद 177 (मॅरक्रम नाबाद 82, डिकॉक 47, रिकेल्टन नाबाद 45, रोस्टन चेस 1 बळी).
टीम इंडियाची चांदी
दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग तुलनेने सोपा झाला आहे. भारताने उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल. आज भारताचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध आहे. हा सामना जिंकल्यास संघाचा आत्मविश्वास दुणावेल आणि 1 मार्चला वेस्ट इंडिजविरुद्ध होणारा सामना ‘करो या मरो’ ठरेल. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या या गिफ्टचा भारत कितपत फायदा करून घेतो, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.