द. आफ्रिकेचा संघ मोठ्या विजयाच्या मार्गावर
लंकेला विजयासाठी 516 धावांचे कठीण आव्हान, स्टब्ज, बहुमा यांचे शतके
वृत्तसंस्था / दरबान
येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत शुक्रवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी यजमान द. आफ्रिकेने लंकेला निर्णायक विजयासाठी 516 धावांचे कठीण आव्हान दिले. द. आफ्रिकेने आपला दुसरा डाव 5 बाद 366 धावांवर चहापानावेळी घोषत केला. कर्णधार बहुमा आणि स्टब्ज यांनी दमदार शतके झळकविताना चौथ्या गड्यासाठी 249 धावांची द्विशतकी भागिदारी केली.
या कसोटीत द. आफ्रिकेचा पहिला डाव 191 धावांत आटोपल्यानंतर लंकेचा पहिल्या डावात 42 धावांत खुर्दा झाला. द. आफ्रिकेने लंकेवर पहिल्या डावात 149 धावांची भक्कम आघाडी मिळविली. द. आफ्रिकेने 3 बाद 132 या धावसंख्येवरुन शुक्रवारी तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे सुरुवात करण्यात आली. स्टब्ज आणि कर्णधार बहुमा यांनी दमदार फलंदाजी करत शतके झळकविली. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 249 धावांची द्विशतकी भागिदारी केली. उपाहारावेळी द. आफ्रिकेने दुसऱ्या डावात 73 षटकात 3 बाद 233 धावा जमविल्या होत्या. खेळाच्या पहिल्या सत्रात द.आफ्रिकेने 101 धावा जमविल्या. बहुमाने 112 चेंडूत 4 चौकारांसह तर स्टब्जने 121 चेंडूत 4 चौकारांसह अर्धशतक झळकविले. या जोडीने चौथ्या गड्यासाठी दीड शतकी भागिदारी 304 चेंडूत नोंदविली. उपाहारानंतर लंकेने दुसरा नवा चेंडू घेतला. स्टब्जने 183 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह शतक झळकविले. तसेच स्टब्ज आणि बहुमा यांनी द्विशतकी भागिदारी 368 चेंडूत पूर्ण केली. बहुमाने 202 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. विश्वा फर्नांडोने स्टब्जचा त्रिफळा उडविला. त्याने 221 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांसह 122 धावा झळकविल्या. त्यानंतर असिता फर्नांडोने बहुमाला पायचित केले. बहुमाने 228 चेंडूत 9 चौकारांसह 113 धावा जमविल्या. बहुमा बाद झाला आणि द. आफ्रिकेने आपला दुसरा डाव 100.4 षटकात 5 बाद 366 धावांवर चहापानावेळी घोषित केला. लंकेला निर्णायक विजयासाठी 516 धावांचे कठीण आव्हान दिले. लंकेतर्फे विश्वा फर्नांडो आणि प्रभात जयसुर्या यांनी प्रत्येकी 2 तर असिता फर्नांडोने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: द. आफ्रिका प. डाव 49.4 षटकात सर्वबाद 191,लंका प. डाव 13.5 षटकात सर्वबाद 42, द. आफ्रिका दु. डाव 100.4 षटकात 5 बाद 366 डाव घोषित (स्टब्ज 122, बहुमा 113, मारक्रेम 47, झोर्झी 17, मुल्डेर 15, बेडींगहॅम नाबाद 21, अवांतर 31, विश्वा फर्नांडो 2-64, प्रभात जयसुर्या 2-132, असिता फर्नांडो 1-54)