द. आफ्रिकेची मालिकेत विजयी आघाडी
विंडीजचा 7 गड्यांनी पराभव, ‘सामनावीर’ डी कॉकचे शतक, रिकेल्टनचे नाबाद अर्धशतक
वृत्तसंस्था / सेंच्युरियन (द. आफ्रिका)
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान द. आफ्रिकेने विंडीजवर 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली आहे. या मालिकेतील झालेल्या दुसऱ्या सामन्यात द. आफ्रिकेने विंडीजचा 7 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात द. आफ्रिकेच्या डी कॉकने दमदार शतक झळकविले. डी कॉकचा शतकी टी-20 सामना होता.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विंडीजने 20 षटकांत 4 बाद 221 धावा जमविल्या. त्यानंतर द.आफ्रिकेने 17.3 षटकांत 3 बाद 225 धावा जमवित मालिकेतील सलग दुसरा विजय नोंदविला. आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना शनिवारी खेळविला जाणार असून यानंतर हे दोन्ही संघ भारतामध्ये पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी दाखल होतील.
या दुसऱ्या सामन्यात विंडीजने पहिल्या सामन्यातील आपल्या संघात केवळ एक बदल केला. यष्टीरक्षक आणि फलंदाज शाय होपला सलामीला खेळविण्याचा निर्णय घेतल्यानंतर होप केवळ 4 धावांवर झेलबाद झाला. ब्रेन्डॉन किंगने 30 चेंडूत अर्धशतक झळकविले. या मालिकेतील दोन दिवसांपूर्वी झालेल्या पार्ल येथील पहिल्या सामन्यात किंगने 48 धावांची खेळी केली होती. येथे हेटमायर आणि किंग यांनी 126 धावांची शतकी भागिदारी केली. किंगने 30 चेंडूत 49 धावा झोडपल्या. तर हेटमायरने 42 चेंडूत 75 धावांची वेगवान खेळी केली. हेटमायरच्या या खेळामध्ये 50 धावा केवळ चौकारांच्या रुपात नोंदविल्या गेल्या. हेटमायर बाद झाल्यानंतर रुदरफोर्डने शेफर्डसमवेत पाचव्या गड्यासाठी 76 धावांची भागिदारी केली. रुदरफोर्डने नाबाद 57 धावा झोडपल्या. शेफर्डने केवळ 17 धावा केल्या. द. आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराजने 22 धावांत 2 गडी बाद केले तसेच जॅन्सेन आणि रबाडा यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला. 11 षटकार व 20 चौकार नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना द. आफ्रिकेने 17.3 षटकांत 3 बाद 225 धावा जमवित हा सामना सात गड्यांनी जिंकला. द. आफ्रिका संघातील फलंदाज डी कॉकचा हा 100 वा टी-20 सामना होता. 2023 साली याच मैदानावर विंडीज विरुद्ध झालेल्या टी-20 सामन्यात डी कॉकच्या नेतृत्वाखाली द. आफ्रिकेने शानदार विजय मिळविला होता. त्या सामन्यामध्ये डी कॉकने टी-20 मधील आपले पहिले शतक झळकविले होते. डी कॉकने गुरूवारच्या सामन्यात 49 चेंडूत 115 धावा झोडपल्या. रिकेल्टनने 36 चेंडूत नाबाद 77 धावांची खेळी केली. डी कॉक आणि रिकेल्टन यांनी 11.5 षटकांत 162 धावांची भागिदारी केली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात डी कॉकला विश्रांती देण्यात आली होती आणि त्या सामन्यात मार्करमने संघाचे नेतृत्व करताना नाबाद 86 धावांची खेळी करत आपल्या संघाला 9 गड्यांनी विजय मिळवून दिला होता.
डी कॉकने गुरूवारच्या सामन्यात 21 चेंडूत अर्धशतक तर 43 चेंडूत शतक पूर्ण केले. अकिल हुसेनच्या गोलंदाजीवर डी कॉकने सलग तीन षटकार खेचले. डी कॉकने 115 धावांच्या खेळीमध्ये 10 षटकार आणि 6 चौकार ठोकले. द. आफ्रिकेच्या रिकेल्टनला 17 धावांवर विंडीजकडून जीवदान मिळाले. या जीवदानाचा लाभ घेत त्याने 25 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. रिकेल्टनने आपल्या नाबाद 77 धावांच्या खेळीमध्ये 3 षटकार आणि 9 चौकार खेचले. द. आफ्रिकेच्या डावात 14 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे अकिल हुसेनने 2 तर फोर्डने 1 गडी बाद केला. द. आफ्रिकेने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 70 धावा जमविताना 1 गडी गमविला. रिकेल्टनने 25 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह अर्धशतक झळकविले. द. आफ्रिकेच्या 200 धावा 95 चेंडूत नोंदविल्या गेल्या.
संक्षिप्त धावफलक: विंडीज 20 षटकांत 4 बाद 221 (हेटमायर 75, रुदरफोर्ड नाबाद 57, किंग 49, शेफर्ड नाबाद 17, अवांतर 17, केशव महाराज 2-22, रबाडा व जॅन्सेन प्रत्येकी 1 बळी), द. आफ्रिका 17.3 षटकांत 3 बाद 225 (मारक्रम 15, डी कॉक 115, रिकेल्टन नाबाद 77, ब्रेव्हीस 4, स्मिथ नाबाद 6, अवांतर 8, अकिल हुसेन 2-41, फोर्ड 1-34).