द.आफ्रिकेची वनडे मालिकेत विजयी आघाडी
सामनावीर मिलर, कर्णधार बवूमा यांची दमदार शतके, ऑस्ट्रेलिया 32 धावांनी पराभूत
वृत्तसंस्था, जोहान्सबर्ग
‘सामनावीर’ डेविड मिलर आणि कर्णधार टेंबा बवूमा यांच्या दमदार शतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली. या मालिकेतील झालेल्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 32 धावांनी पराभव केला.
या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 बाद 365 धावा जमवित ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 366 धावांचे कठीण आव्हान दिले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव 49.5 षटकांत 333 धावांवर आटोपल्याने दक्षिण आफ्रिकेने हा सामना 32 धावांनी जिंकला. या मालिकेतील पहिला सामनाही दक्षिण आफ्रिकेने जिंकल्याने आता ते ऑस्ट्रेलियाचा या मालिकेत व्हाईटवॉश करण्यासाठी प्रयत्न करतील.
द. आफ्रिकेच्या डावामध्ये पहिल्याच चेंडूवर सलामीचा मार्करम खाते उघडण्यापूर्वीच तंबूत परतला. त्यानंतर डिकॉक 2 षटकारांसह 15 धावांवर बाद झाला. ब्रिझेकीने 28 चेंडूत 6 चौकारांसह 34 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेची यावेळी स्थिती 15.3 षटकांत 3 बाद 93 अशी होती.
कर्णधार बवूमा आणि डेव्हिड मिलर या जोडीने चौथ्या गड्यासाठी 156 धावांची दीड शतकी भागिदारी केली. बवूमाने 116 चेंडूत 2 षटकार आणि 10 चौकारांसह 103 धावा झोडपल्या. वनडे क्रिकेटमधील बवूमाचे हे सहावे शतक आहे. डेव्हिड मिलरने 93 चेंडूत 9 षटकार आणि 12 चौकारांसह 142 धावांची खेळी केली. मिलरचे हे वनडे क्रिकेटमधील आठवे शतक आहे. स्टब्जने 6 तर मार्को जेनसनने 2 षटकार आणि 1 चौकारासह 15 चेंडूत 19 तसेच ड्युएन जेनसनने 18 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 27 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावामध्ये 15 षटकार आणि 35 चौकार नोंदविले गेले. दक्षिण आफ्रिकेने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 10 षटकांत 51 धावा जमविताना 2 गडी गमविले. त्यानंतर दुसऱ्या पॉवरप्ले दरम्यानच्या 30 षटकांत त्यांनी 214 धावा जमविताना 3 गडी गमविले. तर शेवटच्या 10 षटकांमध्ये दक्षिण आफ्रिकेने 100 धावा झोडपताना 4 गडी गमविले. ऑस्ट्रेलियातर्फे जॅक एडवर्ड्सने 67 धावांत 5 तर हॅजलवूडने 70 धावांत 3 तसेच बार्टलेटने 70 धावांत 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्णधार मिचेल मार्श आणि हेड या सलामीच्या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या डावाला दमदार सुरुवात करून देताना 17 षटकांत 130 धावांची शतकी भागिदारी केली. मार्शने 53 चेंडूत 5 षटकार आणि 10 चौकारांसह 84 तर हेडने 76 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारांसह 84 धावा जमविल्या. कोनोलीने 2 चौकारांसह 10, कॅरेने 17 धावा केल्या. रेन्शॉने 34 चेंडूत 4 चौकारांसह 32, ग्रीनने 17, एडवर्ड्सने 1 षटकारासह 25 तर बार्टलेटने 28 चेंडूत आक्रमक फटकेबाजी करताना 5 षटकार आणि 2 चौकारांसह अर्धशतक झळकविले.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकांत 77 धावा जमविल्या. त्यानंतर दुसऱ्या पॉवरप्लेमधील 30 षटकांत त्यांनी 176 धावा जमविताना 6 गडी गमविले. शेवटच्या 10 षटकामध्ये ऑस्ट्रेलियाने 80 धावा जमविताना 4 गडी गमविले. दक्षिण आफ्रिकेतर्फे विलियम्सने 54 धावांत 3 तर मार्को जेनसन, केशव महाराज आणि फॉर्च्युन यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. मार्करमने 1 गडी बाद केला.
रविवारचा हा दुसरा सामना कर्करोगावरील संशोधन आणि उपचार यांच्यासाठी निधी गोळा करण्यासाठी खेळविला गेला होता. आतापर्यंत दहावेळा आयसीसीची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱ्या बलाढ्या ऑस्ट्रेलिया संघाला 2014 पासून उभय संघात झालेल्या 6 द्विपक्षीय वनडे मालिका जिंकता आलेल्या नाहीत. आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना येत्या बुधवारी खेळविला जाणार असून ऑस्ट्रेलियन संघ व्हाईटवॉश टाळण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल.
संक्षिप्त धावफलक: द. आफ्रिका 50 षटकांत 9 बाद 365 (बवूमा 103, डेव्हिड मिलर 142, ड्युएन जेनसन नाबाद 27, ब्रिझेकी 34, डिकॉक 15, अवांतर 9, एडवर्ड्स 5-67, हॅजलवूड 3-70, बार्टलेट 1-70), ऑस्ट्रेलिया 49.5 षटकांत सर्वबाद 333 (मार्श 84, हेड 84, रेन्शॉ 32, बार्टलेट 50, एडवर्ड्स 25, ग्रीन 17, कॅरे 17, कोनोली 10, अवांतर 5, विलियम्स 3-54, मार्को जेनसन, केशव महाराज, फॉर्च्युन प्रत्येकी 2 बळी, मार्करम 1-55)