द. आफ्रिकेचे झिम्बाब्वेला 536 धावांचे आव्हान
पहिली कसोटी, मुल्डेरचे दमदार शतक, डब्ल्यू. मसाकाट्झाचे 4 बळी
वृत्तसंस्था / बुलावायो
येथे सुरू असलेल्या पहिला क्रिकेट कसोटीत सोमवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी द. आफ्रिकेने यजमान झिम्बाब्वेला निर्णायक विजयासाठी 536 धावांचे कठीण आव्हान दिले. द. आफ्रिकेचा दुसरा डाव 369 धावांवर आटोपला. मुल्डेरने शानदार शतक (147) तर कर्णधार केशव महाराजने अर्धशतक (51) झळकविले. झिम्बाब्वेतर्फे वेलिंग्टन मसाकाट्झाने 4 गडी बाद केले.
या सामन्यात द. आफ्रिकेने आपला पहिला डाव 9 बाद 418 धावांवर घोषित केल्यानंतर झिम्बाब्वेने पहिल्या डावात 251 धावा जमविल्या. द. आफ्रिकेने 167 धावांची आघाडी मिळविली. सिन विलियम्सच्या शतकामुळे झिम्बाब्वेला 250 धावांचा टप्पा गाठता आला. द. आफ्रिकेच्या मुल्डेरने 50 धावांत 4 तर युसुफने 42 धावांत 3 आणि केशव महाराजने 79 धावांत 3 गडी बाद केले. त्यानंतर द. आफ्रिकेने रविवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर 1 बाद 49 धावा जमविल्या होत्या. या धावसंख्येवरुन त्यांनी तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला.
डी. झोर्जीने 35 चेंडूत 3 चौकारांसह 35 धावा जमविताना मुल्डेर समवेत दुसऱ्या गड्यासाठी 63 धावांची भागिदारी केली. चिवेंगाने झोर्जीला झेलबाद केले. मुल्डेरला बेडींग हॅमकडून चांगली साथ मिळाली. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 72 धावांची भर घातली. मसाकाट्झाने बेडींग हॅमला झेलबाद केले. त्याने 39 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 35 धावा जमविल्या. एका बाजुने मुल्डेर संघाच्या धावसंख्येला आकार देत होता. दरम्यान प्रेटोरियस आणि ब्रेव्हीस हे दोन फलंदाज अनुक्रमे 4 आणि 3 धावांवर बाद झाल्याने द. आफ्रिकेची यावेळी स्थिती 5 बाद 155 अशी होती. चहापानावेळी द. आफ्रिकेने 43 षटकाअखेर 5 बाद 185 धावांपर्यंत मजल मारली होती. मुल्डेरने 149 चेंडूत 1 षटकार आणि 13 चौकारांसह शतक झळकविले.
उपाहारानंतरच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ झाल्यानंतर मुल्डेर मधवेरेच्या गोलंदाजीवर झेल बाद झाला. त्याने 206 चेंडूत 2 षटकार आणि 17 चौकारांसह 147 धावा जमविल्या. व्हेरेनीने 56 चेंडूत 3 चौकारांसह 36 तर बॉश्चने 41 चेंडूत 4 चौकारांसह 36 धावा जमविल्या. व्हेरेनी आणि बॉश्च यांनी आठव्या गड्यासाठी 92 धावांची भागिदारी केली. कर्णधार केशव महाराज 70 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 51 धावांची खेळी केल्याने द. आफ्रिकेला दुसऱ्या डावात 369 धावांपर्यंत मजल मारता आली. चहापानावेळी द. आफ्रिकेने 74 षटकात 7 बाद 336 धावा जमविल्या होत्या तर चहापानानंतर केशव महाराजने 64 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह अर्धशतक झळकविले. द. आफ्रिकेचा दुसरा डाव 82.5 षटकात 369 धावांवर समाप्त झाला. झिम्बाब्वेला निर्णायक विजयासाठी 536 धावांचे कठीण आव्हान द. आफ्रिकेकडून मिळाले. झिम्बाब्वेतर्फे वेलिंग्टन मसाकाट्झाने 98 धावांत 4 तर चिवेंगाने 76 धावांत 2, व्हिन्सेट मसेकेसाने 117 धावांत 2 गडी बाद केले. मुझारबनी व मधवेरे यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.
सुक्षिप्त धावफलक: द. आफ्रिका प. डाव 82.5 षटकात 9 बाद 418 डाव घोषित, झिम्बाब्वे प. डाव 67.4 षटकात सर्वबाद 251, द. आफ्रिका दु. डाव 82.5 षटकात सर्वबाद 369 (मुल्डेर 147, बेडींगहॅम 35, झोर्जी 31, व्हेरेनी 36, बॉश्च 36, केशव महाराज 51, वेलिंग्टन मसाकाट्झा 4-98, चिवेंगा आणि विन्सेंट मसेकेझा प्रत्येकी 2 बळी, मुझारबनी व मधवेरे प्रत्येकी 1 बळी)