पहिल्या कसोटीत द. आफ्रिका सुस्थितीत
सीन विलियम्सचे शतक : मुल्डेरचे चार बळी
वृत्तसंस्था/ बुलावायो
येथे सुरु असलेल्या यजमान झिंबाब्वे विरुद्धच्या पहिल्या कसोटीत रविवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने आपली स्थिती मजबूत केली आहे. झिंबाब्वेचा पहिला डाव 251 धावांत आटोपल्याने द. आफ्रिकेने 167 धावांची भक्कम आघाडी मिळवली आहे. झिंबाब्वेच्या सीन विलियम्सने शानदार शतक (137) झळकाविले. तर दक्षिण आफ्रिकेच्या मुल्डेरने 4 गडी बाद केले.
या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने आपला पहिला डाव 9 बाद 418 धावांवर घोषित केला. प्रेटोरीयस आणि बॉश यांनी दमदार शतके झळकाविली. ब्रेव्हिसने अर्धशतक नोंदविले. झिंबाब्वेतर्फे चिवाँगाने 83 धावांत 4 तर मुझार बनीने 2 गडी बाद केले.
रविवारी झिंबाब्वेने आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली पण पहिल्या षटकात त्यांचा सलामीचा फलंदाज कैतानो खाते उघडण्यापूर्वी बाद झाला. ब्रायन बेनेटला दुखापत झाल्याने तो तंबूत परतला. त्याने 19 धावा केल्या. झिंबाब्वेचा आणखी एक फलंदाज वेल्च 4 धावांवर बाद झाला. सीन विलियम्स आणि कर्णधार इर्व्हिन यांनी संघाचा डाव सावरताना तिसऱ्या गड्यासाठी 91 धावांची भागिदारी केली. इर्व्हिनने 4 चौकारांसह 36 धावा जमविल्या. मधवेरे मुल्डेरच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याने 1 षटकारासह 15 धावा केल्या. सीन विलियम्सने 164 चेंडूत 16 चौकारांसह 137 धावा झळकाविल्याने झिंबाब्वेला 251 धावांपर्यंत मजल मारता आली. विलियम्स 8 व्या गड्याच्या रुपात बाद झाला. दक्षिण आफ्रिकेतर्फे मुल्डेरने 50 धावांत 4 तर यूसूफ आणि कर्णधार केशव महाराज यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. चहापानानंतर झिंबाब्वेचा पहिला डाव 67.4 षटकात 251 धावांवर आटोपला. उपहारापर्यंत झिंबाब्वेने 2 बाद 94 धावा जमविल्या होत्या. विलियम्सने 122 चेंडूत 12 चौकारांसह शतक झळकाविले. चहापानावेळी झिंबाब्वेने 6 बाद 212 धावांपर्यंत मजल मारली होती. खेळाच्या शेवटच्या सत्रातील पहिल्या तासभरातच झिंबाब्वेचा डाव संपुष्टात आला.
संक्षिप्त धावफलक - द. आफ्रिका 90 षटकात 9 बाद 418 डाव घोषित, झिंबाब्वे प. डाव 67.4 षटकात सर्व बाद 251 (विलियम्स 137, इर्व्हिन 36, बेनेट दुखापतीने निवृत्त 19, मधवेरे 15, अवांतर 9, मुल्डेर 4-50, यूसूफ 3-42, केशव महाराज 3-70).