दक्षिण आफ्रिकेकडे दर्जेदार फलंदाजी : लायन
वृत्तसंस्था/ लंडन ड्यूक
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये जागतिक दर्जाच्या दक्षिण आफ्रिकी फलंदाजांना सामोरे जाण्यास ऑस्ट्रेलियन अनुभवी फिरकी गोलंदाज नाथन लायन उत्सुक आहे. सलामीला येणारे एडेन मार्करम आणि रायन रिकेलटन तसेच गेल्या वर्षीपासूनचा त्याचा काउंटी क्रिकेटमधील प्रतिस्पर्धी डेव्हिड बेडिंगहॅम यासह दक्षिण आफ्रिकेकडे दर्जेदार फलंदाजी आहे, याकडे त्याने लक्ष वेधले आहे. 11 जूनपासून सुरू होणाऱ्या अंतिम कसोटीत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप किताब राखून ठेवणारा पहिला संघ बनण्याचे ऑस्ट्रेलियाचे लक्ष्य असेल.
553 कसोटी बळी मिळविलेला लायन लॉर्ड्सवर वर्चस्व गाजवण्याची शक्यता आहे. परंतु 2023-25 च्या डब्ल्यूटीसी स्पर्धेत चमक दाखविलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या दर्जेदार फलंदाजीला त्याचा संघ कमी लेखू इच्छित नाही. लायन म्हणाला की, ब्रिटनमध्ये मागील डब्ल्यूटीसी फायनल खेळण्याचा अनुभव ऑस्ट्रेलियाला मदत करेल, परंतु या सामन्यात काहीही घडणे शक्य आहे.
दक्षिण आफ्रिकेकडे काही जागतिक दर्जाचे फलंदाज आहेत आणि तेथे काही चांगले गोलंदाज देखील आहेत. म्हणून हे एक चांगले आव्हान असणार आहे. अर्थात हा एकच कसोटी सामना आहे. परदेशी परिस्थिती आणि ड्यूक्स बॉल हे एक वेगळे आव्हान असेल. दोन सर्वोत्तम गोलंदाजी असलेले संघ एकमेकांवर हल्ला करतील. ही आणखी एक रोमांचक गोष्ट आहे. हे सर्व पाहता फलंदाजांसाठी हे एक चांगले आव्हान असणार आहे, असे लायन पुढे म्हणाला.
फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेत कसोटी मालिकेत खेळल्यानंतर लायन कोणतेही स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नसला, तरी या 37 वर्षीय खेळाडूला पूर्वीपेक्षा अधिक तंदुऊस्त वाटत आहे आणि सर्वोत्तम कामगिरी करण्यास तो उत्सुक आहे. ‘श्रीलंकेतील सामन्यांनंतर फिटनेसची बाब ठीक करण्यासाठी मी थोडा ब्रेक घेतला होता आणि आता सर्व काही ठीक आहे. श्रीलंकेविऊद्धच्या सामन्यांनंतर मी सराव थांबवलेला नाही’, असे तो म्हणाला.