नव्या ‘जी20’ यादीतून दक्षिण आफ्रिका बाहेर
अमेरिकेने घेतला निर्णय : दोन्ही देशांच्या संबंधांमधील कटूता कायम
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेने पुढील वर्षी मियामी शहरात होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेच्या तयारी अंतर्गत एका मोठ्या बदलाची घोषणा करत ‘न्यू जी20’चा आराखडा सादर केला आहे. या नव्या स्वरुपात पोलंडला सदस्य करण्यात आले असून दक्षिण आफ्रिकेला स्पष्ट स्वरुपात वगळण्यात आले आहे. अलिकडेच दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या जी-20 शिखर परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भाग घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये कटूता निर्माण झाली आहे.
दक्षिण आफ्रिका स्वत:च्या अध्यक्षत्वादरम्यान ‘द्वेष, विभाजन आणि कट्टरवादी अजेंड्या’ला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो यांनी केला आहे. 2026 ची शिखर परिषद अमेरिकेत होणार आहे. 2009 नंतर पहिल्यांदाच अमेरिका जी-20 शिखर परिषदेचे आयोजन करणार असल्याचे रुबियो यांनी म्हटले आहे.
अमेरिका स्वत:चे मित्र आणि भागीदारांना या परिषदेत सामील करणार असून यात पोलंडचा प्रामुख्याने समावेश असेल. पोलंड हा भविष्य-केंद्रीत विकास आणि अमेरिकेसोबत यशस्वी भागीदारीचे उदाहरण आहे. तर सर्वात मोठा बदल दक्षिण आफ्रिकेला जी-20 तून बाहेर काढण्याचा असल्याचे वक्तव्य रुबियो यांनी केले आहे.
वर्णद्वेषानंतरच्या शक्यतांना दक्षिण आफ्रिकेने पुनर्वितरणवादी धोरणे आणि वांशिक कोट्याद्वारे कमजोर केले आहे, यामुळे गुंतवणूक ठप्प झाली असून अर्थव्यवस्था कोलमडली आहे. तर नवा जी20 चार कार्यसमुहांच्या माध्यमातून 3 प्रमुख विषयांवर काम करणार असून यात नियामकीय भारामध्ये कपात, स्वस्त आणि सुरक्षित ऊर्जा पुरवठासाखळी आणि आर्टिफिशियल इंटेलिजेन्स तसेच नव्या तंत्रज्ञानांमध्ये नेतृत्व सामील असेल असे रुबियो यांनी सांगितले आहे.
दक्षिण आफ्रिका सरकारकडून श्वेतवर्णीय शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेतल्या जात असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेत श्वेतवर्णीयांचा छळ होत असल्याचे म्हणत ट्रम्प यांनी निर्बंध लादण्याचा इशारा यापूर्वी दिला आहे.