For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

द. आफ्रिकेचा न्यूझीलंडवर 7 गड्यांनी विजय

06:58 AM Mar 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
द  आफ्रिकेचा न्यूझीलंडवर 7 गड्यांनी विजय
Advertisement

5 सामन्यांची टी-20 मालिका : एन्कोबनी मोकोएना सामनावीर, कोएत्झी, बार्टमन, केशव महाराजचे प्रत्येकी 2 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ माऊंट माँगनुई

येथील बे ओव्हल मैदानावर रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका पुरुष संघाने यजमान न्यूझीलंडचा 20 चेंडू बाकी ठेऊन 7 गड्यांनी पराभव करत 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत विजयी सलामी दिली. 26 धावांत 3 गडी बाद करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा 19 वर्षीय पदार्पणवीर एन्कोबनी मोकोएनाला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisement

या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा डाव 14.3 षटकात केवळ 91 धावांत खुर्दा झाला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 16.4 षटकात 3 बाद 93 धावा जमवित हा सामना 7 गड्यांनी जिंकला.

न्यूझीलंडच्या डावामध्ये नीशमने 21 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 26, कर्णधार सँटनरने 2 चौकारांसह 15, मॅकाँचीने 1 चौकारासह 15, तर बेव्हन जेकब्सने 1 षटकारासह 10 धावा केल्या. न्यूझीलंडच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. न्यूझीलंडच्या डावात 2 षटकार आणि 7 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडने पॉवरप्लेच्या 6 षटकात 36 धावा जमविताना 5 गडी गमाविले. दक्षिण आफ्रिकेतर्फे मोकोएनाने 26 धावांत 3 तर कोएत्झी, बार्टमन आणि कर्णधार केशव महाराज यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेच्या डावात सलामीच्या ईस्टरहुइझेनने 48 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 45 धावा जमविल्या. सलामीचा टोनी डी झॉर्झी केवळ 2 धावावर बाद झाला. रुबिन हर्मनने 1 चौकारासह 7 तर जेसन स्मिथने 1 चौकारासह 10 धावा केल्या. फॉरेस्टरने 25 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 16 धावा जमविताना चौथ्या गड्यासाठी ईस्टरहुइझेनसमवेत अभेद्य 38 धावांची भागिदारी करीत विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेच्या डावात 3 षटकार आणि 4 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे जेमिसन, फॉक्स आणि सँटनर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दक्षिण आफ्रिकेतर्फे टी-20 प्रकारात पदार्पणातच मोकोएनाने सामनावीराचा पुरस्कार मिळविला.

संक्षिप्त धावफलक - न्यूझीलंड 14.3 षटकात सर्वबाद 91 (निश्चाम 26, सँटेनर 15, जेकॉब्ज 10, मॅकाँची 15, मोकोएना 3-26, कोझी, बार्टमन आणि केशव महाराज प्रत्येकी 2 बळी), दक्षिण आफ्रिका 16.4 षटकात 3 बाद 93 (ईस्टरहुइझेन नाबाद 45, फॉरेस्टर नाबाद 16, जेसन स्मिथ 10, हर्मन 7, अवांतर 13, जेमिसन, फॉक्स आणि सँटेनर प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.