For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

द.आफ्रिकेचा विंडीजवर 9 गड्यांनी विजय

06:33 AM Jan 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
द आफ्रिकेचा विंडीजवर 9 गड्यांनी विजय
Advertisement

वृत्तसंस्था / पार्ल (द. आफ्रिका)

Advertisement

कर्णधार एडन मार्करमच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर येथे सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान द. आफ्रिकेने विजयी सलामी देताना विंडीजचा 9 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या विजयामुळे द. आफ्रिकेने गेल्या आठ सामन्यांतील विजयाचा दुष्काळ संपुष्टात आणला.

या सामन्यात द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. विंडीजने 20 षटकांत 7 बाद 173 धावा जमविल्या. त्यानंतर द. आफ्रिकेने 13 चेंडू बाकी ठेवून 1 बाद 176 धावा जमवित विंडीजचा एकतर्फी पराभव केला.

Advertisement

विंडीजच्या डावामध्ये हेटमायरने 48 तर रोवमन पॉवेलने नाबाद 29 धावा जमविल्या. या जोडीने 74 धावांची भागिदारी केली. द. आफ्रिकेतर्फे जॉर्ज लिन्डेने 25 धावांत 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना द. आफ्रिकेने 17.5 षटकांत 1 बाद 176 धावा जमवित हा सामना 9 गड्यांनी जिंकला. कर्णधार मारक्रमने 47 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 86 तर प्रेटोरियसने 44 तसेच रिकेल्टनने नाबाद 40 धावा झळकविल्या. 7 फेब्रुवारीपासून आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला भारत आणि लंका यांच्या संयुक्त यजमानपदाने सुरूवात होणार असून द. आफ्रिकेला या मालिकेतील विजय अधिक आत्मविश्वास वाढविणारा ठरेल. या मालिकेतील दुसरा सामना गुरूवारी सेंच्युरियन येथे खेळविला जाईल.

संक्षिप्त धावफलक: विंडीज 20 षटकांत 7 बाद 173 (हेटमायर 48, पॉवेल नाबाद 29, लिन्डे 3-25), द. आफ्रिका 17.5 षटकांत 1 बाद 176 (मार्करम नाबाद 86, प्रेटोरियस 44, रिकेल्टन नाबाद 40)

Advertisement
Tags :

.