For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दक्षिण आफ्रिकेचा अफगाणवर 5 गड्यांनी विजय

06:58 AM Nov 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
दक्षिण आफ्रिकेचा अफगाणवर 5 गड्यांनी विजय
Advertisement

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप : सामनावीर रासी व्हान डर ड्युसेनचे नाबाद अर्धशतक, फेहलुक्वायोची फटकेबाजी, कोएत्झीचे 4 बळी

Advertisement

वृत्तसंस्था / अहमदाबाद

सामनावीर रासी व्हान डर ड्युसेनचे नाबाद अर्धशतक, क्विन्टन डी कॉक व फेहलुक्वायो यांची जोरदार फटकेबाजी आणि गेराल्ड कोएत्झीचा भेदक मारा यांच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने प्राथमिक फेरीतील आपल्या शेवटच्या सामन्यात कडवा प्रतिकार करणाऱ्या अफगाणवर 5 गड्यांनी विजय मिळविला.

Advertisement

दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी सुरुवातीला अफगाणिस्तान संघावर वर्चस्व निर्माण केले होते. मात्र, त्यानंतर अष्टपैलू अझमत उमरझाईने शानदार नाबाद 97 धावा करत संघाला 244 अशी सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. आफ्रिकेकडून गेराल्ड कोएत्झीने सर्वाधिक चार बळी मिळवले. त्यानंतर  द.आफ्रिकेने 47.3 षटकांत 5 बाद 247 धावा जमवित विजय साकार केला. बवुमा व डी कॉक यांनी द.आफ्रिकेला 64 धावांची अर्धशतकी सलामी दिल्यानंतर दोघेही दोन धावांच्या फरकाने बाद झाले. डी कॉकने 41, बवुमाने 23 धावा जमविल्या. व्हान डर ड्युसेनने मार्करमसह 50 धावांची भागीदारी केली. मार्करम 32 चेंडूत 25 धावा काढून बाद झाला. अफगाणच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करीत आफ्रिकन फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. क्लासेन  (10), मिलर (24) यांच्यासमवेत छोट्या भागीदारी करीत ड्युसेनने संघाला विजयासमीप आणले. 5 बाद 182 अशा स्थितीनंतर ड्युसेनला फेहलुक्वायोकडून चांगली साथ मिळाली. एकेरी-दुहेरी धावा जमवित ते विजयासमीप आले. 14 धावांची गरज असताना फेहलुक्वायोने नवीन उल हकला दोन षटकार, 1 चौकार मारत विजय साकार केला. तो 39 धावांवर नाबाद राहिला.

प्रारंभी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अफगाण संघाची सुरुवात चांगली झाली. त्यांनी 40 धावांपर्यंत एकही विकेट गमावली नाही. रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रन यांनी सुरुवातीच्या पॉवरप्लेमध्ये काही चांगले शॉट्स खेळले. आफ्रिकेला पहिले यश केशव महाराजने मिळवून दिले, त्याने गुरबाजला तंबूत पाठवले. गुरबाजने 22 चेंडूत 25 धावा केल्या. गुरबाजनंतर अफगाणिस्तानने लवकरच आणखी 2 विकेट गमावल्या. इब्राहिम झद्रन 15 धावा काढून परतला तर कर्णधार हशमतउल्लाहला फारशी चमक दाखवता आली नाही. 45 धावांवर तिसरी विकेट पडल्यानंतर रहमत शाह आणि अजमतुल्लाह उमरझाई यांनी 49 धावांची भागीदारी करत डाव सावरला. यानंतर रहमतला लुंगी एनगिडीने बाद केले. रहमतने 26 धावा केल्या. यानंतर इतर तळाच्या फलंदाजांना मात्र अपेक्षित खेळी साकारता आली नाही. मोहम्मद नबी 2, रशीद खान 14 तर नूर मोहम्मदने 26 धावा फटकावल्या.

दरम्यान, अफगाणिस्तानला उमरझाईच्या मोठ्या खेळीची गरज होती. उमरझाईने अफगाण चाहत्यांना निराश केले नाही आणि जबाबदारीने खेळी खेळली. त्याने आपल्या संघाला 244 धावांपर्यंत मजल मारून दिली. उमरझाईने 107 चेंडूंचा सामना करताना 3 षटकार आणि 7 चौकारांसह नाबाद 97 धावा केल्या. त्याला शेवटच्या षटकात शतक पूर्ण करण्याची संधी होती. पण कागिसो रबाडाने आपल्या अनुभवाचा फायदा घेत शेवटचे षटक अप्रतिम टाकले. यामुळे उमरझाईला शतक पूर्ण करता आले नाही. अखेरच्या षटकात नवीन उल हक बाद झाल्यानंतर अफगाण संघाचा डाव 244 धावांवर संपुष्टात आला. आफ्रिकेकडून कोएत्झीने सर्वाधिक 4 तर एन्गिडी व केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक : अफगाणिस्तान 50 षटकांत सर्वबाद 244 (गुरबाज 25, रहमत शाह 26, उमरझाई नाबाद 97, नूर अहमद 26, कोएत्झी 44 धावांत 4 बळी, एन्गिडी व केशव महाराज प्रत्येकी दोन बळी).

द.आफ्रिका 47.3 षटकांत 5 बाद 247 : डी कॉक 47 चेंडूत 2 चौकार, 3 षटकारांसह 41, बवुमा 28 चेंडूत 23, रासी व्हान डर ड्युसेन 95 चेंडूत 6 चौकार, 1 षटकारासह नाबाद 76, मार्करम 32 चेंडूत 25, क्लासेन 13 चेंडूत 10, डेव्हिड मिलर 33 चेंडूत 24, फेहलुक्वायो 37 चेंडूत 1 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 39, अवांतर 9. गोलंदाजी : नबी 2-35, रशिद खान 2-37, मुजीब उर रहमान 1-51.

वर्ल्ड कपमध्ये यष्टीमागे झेल टिपण्यात क्विन्टन डी कॉक तिसरा

अफगाणिस्तानची सुरुवात खूपच खराब झाली. त्यांनी डावातील 43व्या षटकांच्या खेळापर्यंत 7 विकेट्स गमावल्या. यातील 5 विकेट्स या क्विंटन डी कॉकने यष्टीमागे झेल घेत घेतल्या. हे 5 झेल डी कॉकच्या नावावर नोंदवले गेले. वनडे विश्वचषकाच्या इतिहासात यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत डी कॉकने तिसरे स्थान मिळवले. त्याच्या नावावर आता 35 विकेट्सची नोंद झाली आहे. डी कॉकने याबाबतीत धोनीला मागे टाकले आहे. धोनीने विश्वचषकाच्या इतिहासात यष्टीमागे 34 झेल पकडले होते. तसेच, याबाबतीत अव्वलस्थानी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू अॅडम गिलख्रिस्ट आहे. त्याच्या नावावर यष्टीमागे एकूण 45 झेल आहेत. याव्यतिरिक्त दुसऱ्या स्थानी श्रीलंकेचा कुमार संगकारा असून त्याने विश्वचषकात यष्टीमागे एकूण 41 झेल पकडले आहेत.

Advertisement
Tags :

.