Kolhapur News: आवाज मर्यादेचे उल्लंघन 203 मंडळांवर खटले, शहरातील 41 मंडळांचा समावेश
मंडळांना पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या होत्या
कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये आवाज मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या 203 तरुण मंडळांवर खटले दाखल करण्याच्या हालचाली पोलीस प्रशासनाने सुरु केल्या आहेत. यामध्ये शहरातील 41 मंडळांचा समावेश आहे. विसर्जन मिरवणुकीत आवाजाचे नमुने घेण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात 203 मंडळांनी ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे.
पारंपरिक विसर्जन मार्गावर सहभागी झालेल्या सर्वच मंडळांच्या आवाजाचे नमुने पोलीस प्रशासनाच्या वतीने घेण्यात आले आहेत. यामध्ये पाटाकडील, अवचितपिर, दिलबहार, संध्यामठ, बालगोपाल, सुबराव गवळी, शहाजी तरुण मंडळ, वाघाची तालीम, यु. के. बॉईज यांच्यासह 41 मंडळांनी आवाज मर्यादेचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे.
या सर्वांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी दिली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. याचसोबत साऊंड सिस्टीम चालकांसोबतही बैठका घेतल्या होत्या.
यामध्ये मंडळांना पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पहिल्यांदा प्रेमाने आणी शेवटच्या टप्प्यात कारवाईची भीती घालून मंडळांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला होता. मात्र तरीही जिह्यामध्ये गणेशोत्सवादरम्यान आजअखेर 451 मंडळांवर खटले दाखल करण्याच्या हालचाली पोलीस प्रशासनाच्या वतीने सुरु केल्या आहेत.
वारंवार उल्लंघन करणाऱ्या 10 मंडळांवर कारवाई गणेशोत्सवात वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 10 मंडळांवर कारवाई करण्यात आली आहे. या मंडळांविरोधात विशेष खटले न्यायालयात दाखल करण्यात येणार आहेत.
आजअखेर दाखल खटले
- कोल्हापूर शहर : 151
- करवीर उपविभाग : 62
- इचलकरंजी उपविभाग : 113
- शाहूवाडी उपविभाग : 62
- जयसिंगपूर उपविभाग : 36
- गडहिंग्लज उपविभाग : 28
- एकूण : 452