For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शरीराच्या हालचालीतून निर्माण होणारे सुखदु:ख आत्मा भोगत असतो

06:14 AM Sep 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
शरीराच्या हालचालीतून निर्माण होणारे सुखदु ख आत्मा भोगत असतो
Advertisement

अध्याय आठवा

Advertisement

माऊली म्हणतात, अव्यक्तातून काही काळ सर्व भुते व्यक्त होतात आणि पुन्हा अव्यक्तात परत जातात. त्याही पलीकडे असलेल्या अव्यक्तास अक्षर असे म्हणतात. ते भगवंतांचे अत्यंत श्रेष्ठ असे स्वरूप आहे. त्या अव्यक्तात प्रवेश मिळवणे हीच अत्यंत श्रेष्ठ गती होय. ती मिळाल्यावर प्राण्याचे जन्ममृत्यूचे चक्र संपून जाते. ह्या अर्थाचा

त्यास अक्षर हे नाम ती चि शेवटची गति । माझे परम ते धाम जेथूनि परते चि ना ।। 21 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार, हे अव्यक्त दिसत नसलेल्या अव्यक्ताच्या पलीकडे असते. ह्या ब्रह्माला अक्षर म्हणजे नष्ट न होणारे असे म्हणतात. ह्याच्या पलीकडे काही एक विस्तार नसतो म्हणून हीच परमगती होय.

Advertisement

परमेश्वराच्या अवताराबद्दल सांगायचं झालं तर ज्याप्रमाणे चंद्राचे प्रतिबिंब पाण्यात पडले तरी चंद्र आहे तिथेच असतो त्याप्रमाणे परमेश्वर अवतार घेऊन सगुण रुपात सर्वांच्यासमोर आला तरी ते सगुण रूप तात्पुरते असल्याने त्याचे नित्य असणे आणि निराकारपण आहे तसेच राहते. ही परमगती आपल्या आत्म्याला मिळवून देण्याचा प्रयत्न करणे हेच मनुष्य जन्मातले सर्वोच्च कर्तव्य होय.

प्राणीमात्रांमध्ये ईश्वरी अंश आत्म्याच्या स्वरुपात हजर असतो पण तो केवळ साक्षी असल्याने स्वत: देहाची कोणतीही हालचाल घडवून आणत नाही. तरीही शरीराच्या हालचाली सुरूच असतात. ज्याप्रमाणे शहरात चालणाऱ्या व्यापारामुळे जमा झालेला कर राजाला मिळतो त्याप्रमाणे मनात येणाऱ्या विचारामुळे होणाऱ्या शरीराच्या हालचालीतून निर्माण होणारे सुखदु:ख शरीरातील आत्मा भोगत असतो. ज्याप्रमाणे राजा सुखाने महालात पडला असला तरी नगरातले व्यवहार सुरूच असतात त्याप्रमाणे शरीरातील आत्मा हा राजाप्रमाणे निक्रिय असला तरी माणसाच्या बुद्धीची जाणण्याची क्रिया अथवा मनाचे मी असे करीन, मी तसे करीन असे संकल्प आणि त्यानुरूप घेण्यादेण्याची क्रिया, इंद्रियांचे व्यापार व प्राणवायूची हालचाल ह्या सर्व देहक्रिया परमात्म्याने स्वत: न करविता होत असतात. सूर्याचा काहीएक संबंध नसला तरी त्याच्या प्रकाशात माणसांचे व्यवहार होत असतात तसे आत्म्याचा शरीराच्या व्यवहारांशी काहीएक संबंध नसला तरी ते होत असतात. अशा व्यवहारातून निर्माण होणारे सुखदु:ख मात्र आत्मा भोगत असतो.

पुढील श्लोकात परमेश्वराबद्दल किंवा परमपुरुषाबद्दल सांगताना भगवंत म्हणतात, ज्यामध्ये सर्व भूते सामावलेली आहेत ज्याने हे सर्व विश्व व्यापलेले आहे. त्या पुरुषाची प्राप्ती अनन्य भक्तीने होते.

लाभे अनन्य-भक्तीने पार्था पुरुष थोर तो । ज्यात ही राहती भूते ज्याने विस्तारले जग ।।22 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, आत्मा हा शरीरातच निजल्यासारखा असतो, म्हणून त्याला पुरुष असे म्हणतात. त्याला पुरुष म्हणण्याचे दुसरे कारण असे की, हा आत्मा एकपत्नीव्रताने पतिव्रता प्रकृती बरोबर नांदत असतो. ह्याचे महात्म्य असे की, चारी वेदांचा विस्तार त्या परमात्म्याचे आंगणाही पाहू शकत नाही. चैतन्य आकाशाचे पांघरुण आहे.

क्रमश:

Advertisement
Tags :

.