सोरोस-युनूस यांचे संबंध उघड
सोरोस यांचा पुत्र बांगलादेशच्या दौऱ्यावर : आर्थिक मदतीचे आश्वासन
वृत्तसंस्था/ढाका
बांगलादेशात मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार अमेरिकेत ट्रम्प अध्यक्ष झाल्यापासून चिंताग्रस्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर युनूस यांची पाठराखण करणाऱ्या ओपन सोसायटी फौंडेशनचे नेते अन् भारताच्या विरोधात कट रचणारे जॉर्ज सोरोस यांचे पुत्र एलेक्स यांनी बांगलादेशचा दौरा केला आहे. एलेक्स सोरोस यांनी मोहम्मद युनूस यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. एलेक्स सोरोस हे स्वत:चे वडिल जॉर्ज सोरोस यांच्या द ओपन सोसायटी फौंडेशनचे अध्यक्ष आहेत. सोरोस यांनी युनूस सरकारला आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. मानवाधिकारांचे चॅम्पियन आणि ओपन सोसायटीचे जुने मित्र मोहम्मद युनूस यांना भेटण्यासाठी ढाका येथे आल्यानंतर सन्मानित झाल्याचे वाटत आहे. हा बांगलादेशसाठी बदल घडवून आणण्याकरता महत्त्वपूर्ण काळ आहे आणि आम्ही महत्त्वपूर्ण सुधारणा आणि गुंतवणुकीवर सहकार्य दृढ करण्याच्या पद्धतींवर चर्चा केल्याचा दावा एलेक्स यांनी केला आहे.
तीन दिवसांपूर्वीच ट्रम्प प्रशासनाने बांगलादेशला देण्यात येणाऱ्या कोट्यावधी डॉलर्सच्या आर्थिक मदतीला स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर एलेक्स यांनी बांगलादेशचा दौरा केला आहे. तर दुसरीकडे जो बिडेन यांनी स्वत:च्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळाच्या अखेरच्या दिवसांमध्ये जॉर्ज सोरोस यांना अमेरिकेतील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविले होते. बांगलादेशला करण्यात आलेल्या प्रत्येक आर्थिक मदतीची चौकशी करणार असल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकेच्या माजी विदेशमंत्री हिलरी क्लिंटन यांनी स्वत:च्या क्षमतेचा गैरवापर करत 13 दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक निधी मोहम्मद युनूस यांना दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
युनूस यांच्या कन्या अडचणीत
अमेरिकेत राहत असलेल्या मोहम्मद युनूस यांच्या कन्या मोनिका युनूस यांच्या अडचणी आता वाढणार आहेत. माजी अध्यक्ष जो बिडेन यांच्या प्रशासनात मोनिका युनूस महत्त्वाची भूमिका बजावत होत्या. नव्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडून आता मोनिका यांच्या कामकाजाची चौकशी केली जाणार आहे.