लवकरच तेहरानही ‘स्वतंत्र’ होईल !
इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांचा इराणच्या जनतेला सूचक संदेश
वृत्तसंस्था / जेरुसलेम
इराणच्या धर्मांध सत्ताधीशांनी निर्माण केलेल्या दहशतवादाचा संपूर्ण नायनाट करण्याचे इस्रायलचे ध्येय आहे. या दिशेने आमचा देश वेगाने प्रगती करत असून लवकरच इराणची राजधानी तेहरानही या धर्मांधांच्या तावडीतून स्वतंत्र होईल, असे खळबळजनक विधान इस्रालयाचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केले आहे.
इराणच्या प्रशासनाला सोमवारी त्यांनी गंभीर इशारा दिला आहे. संपूर्ण मध्यपूर्वेत इस्रायल पोहचू शकणार नाही, असे एकही स्थान नाही. इराणच्या शासनकर्त्यांमुळे मध्यपूर्वेचा संपूर्ण भाग युद्धाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता आहे. इराण्याच्या शासनकर्त्यांची धोरणे जागतिक शांततेला सर्वात मोठा धोका ठरत आहेत. इराणच्या सर्वसामान्य जनतेलाही या धोरणांचा त्रास होत आहे. युद्धपिपासू वृत्तीने पछाडलेल्या इराणी प्रशासनामुळे आम्हालाही आमच्या संरक्षणसाठी प्रतिवार करणे अनिवार्य झाले आहे इस्रायलच्या सामर्थ्याला कोणी डिवचण्याचा प्रयत्न करु नये. गेल्या काही दिवसांमध्येच इस्रायलने इराण समर्थित दहशतवादी संघटना हिजबुल्लाचे अनेक महत्वाचे नेते अचूकपणे टिपले आहेत. आम्ही या प्रदेशात आता कोठेही आणि केव्हाही पोहचू शकतो, हे इस्रायलच्या शत्रूंनी लक्षात ठेवावे. त्यांनी आगीशी खेळू नये, असा परखड इशारा बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणला दिला आहे.