सोनुर्ली - वेत्ये रस्त्याचे काम दोन वर्षापासून अर्धवट स्थितीत
रस्त्यावरच उपोषण छेडण्याचा सोनुर्लीवासीयांचा इशारा
ओटवणे | प्रतिनिधी
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सोनुर्ली - वेत्ये या महत्त्वाच्या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून अर्धवट स्थितीत असून याचा वाहन चालकांना फटका बसत आहे. संबंधित बेजबाबदार ठेकेदाराला अधिकारी वर्ग पाठीशी घालत असल्यामुळेच या रस्त्याचे काम रखडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून येत्या चार दिवसात रस्त्याचे काम सुरू न केल्यास या रस्त्यावरच उपोषण छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर सुमारे ३.१६५ किलोमीटरच्या या रस्त्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे पावणेदोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान होते. त्यानुसार गेल्या वर्षी २९ जानेवारी २०२४ ला या रस्त्याच्या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले. त्यानंतर ठेकेदाराने काम सुरू केले. मात्र गेल्या वर्षभरापासून या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असून याचा फटका या मार्गावरील वाहन चालकांना बसत आहे. याचे संबंधित ठेकेदारासह अधिकारी वर्गाला सोयर सुतक नाही.याबाबत सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर यांनी संबंधित ठेकेदारासह अधिकारी वर्गाचे अनेक वेळा लक्ष वेधले मात्र केवळ आश्वासना पलीकडे कोणतेही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदारासह अधिकारी वर्गाच्या कर्तव्यशून्य कारभाराबाबत तीव्र नाराजी आहे. त्यामुळे येत्या चार दिवसात या रस्त्याचे काम सुरू न केल्यास याकडे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावरच ठाण मांडून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सोनुर्ली ग्रामस्थांच्यावतीने उपसरपंच भरत गावकर यांनी दिला आहे.