सोनियांची ईडीकडून तीन तास चौकशी
नॅशनल हेरॉल्ड प्रकरण : 25 जुलैला पुन्हा पाचारण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीने गुरुवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची जवळपास तीन तास चौकशी केली. आता 25 जुलै रोजी सोनियांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. ईडीने पहिल्या टप्प्यात 50 प्रश्नांची यादी तयार केली असून ईडीच्या अधिकाऱयांनी राहुल गांधींना जे प्रश्न विचारले तेच प्रश्न सोनिया गांधींनाही विचारण्यात आल्याचे समजते. सोनियांच्या या चौकशीदरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभरात सोनियांच्या या ईडी चौकशीविरोधात निदर्शने केली.
अंमलबजावणी संचालनालयातील महिला अधिकारी मोनिका शर्मा यांनी सोनिया गांधी यांची चौकशी केली. त्या ईडी कार्यालयात अतिरिक्त संचालक पदावर कार्यरत आहेत. चौकशीला सामोरे जाण्यासाठी सोनिया गांधी यांना ईडीकडून आतापर्यंत 8 जून, 11 जून आणि 23 जून अशा तीनवेळा समन्स बजावण्यात आले होते. तथापि, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी वेळ वाढवून मागितला होता. सध्या त्यांची प्रकृती ठिकठाक असली तरी चौकशीदरम्यान ईडीच्या अधिकाऱयांनी सोनिया गांधींच्या प्रकृतीचीही काळजी घेतली. त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय अधिकारी सज्ज ठेवण्यात आले होते.
ईडीच्या अधिकाऱयांकडून प्रश्नावली
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एजन्सीने सोनिया गांधी यांच्या चौकशीसाठी दोन साहाय्यक संचालक आणि एका महिला साहाय्यक संचालकांची नियुक्ती केली आहे. सोनियांच्या चौकशीसाठी ईडीने 50 हून अधिक प्रश्न तयार केले आहेत. तुम्ही यंग इंडियाच्या संचालक का झालात? यंग इंडिया कंपनीचे नेमके काम काय होते? काँग्रेस आणि एजेएल यांच्यात कोणत्या प्रकारचा व्यवहार झाला? एजेएलची देशभरात किती मालमत्ता होती? अशा काही प्रश्नांचा त्यात समावेश आहे. ईडीने या प्रश्नात राहुल गांधींच्या चौकशीत समोर आलेल्या गोष्टींचाही समावेश केला आहे.
यापूर्वी राहुल गांधींची 40 तास चौकशी
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पाचवेळा चौकशी केली आहे. सुमारे 40 तास त्यांची चौकशी आणि उत्तरे देण्यात आली. आता सोनिया गांधी चौकशीच्या फेऱयात अडकल्या आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी या तपासात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
काँग्रेस नेते-समर्थक आंदोलनावेळी ताब्यात
सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीला विरोध करणाऱया काँग्रेसच्या 75 खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये मल्लिकार्जुन खर्गे, शशी थरूर, अजय माकन आणि पी. चिदंबरम यांचा समावेश आहे. याशिवाय राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. वेगवेगळय़ा राज्यांमध्येही चौकशीदरम्यान आंदोलन झाले असून तेथे नेते-कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.