सोनिया-राहुल गांधी यांची राष्ट्रपतींवर खोचक टिप्पणी
भाजपकडून ‘समाचार’ : राष्ट्रपती भवनाकडूनही गंभीर दखल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
18 व्या लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या संयुक्त अधिवेशनात 59 मिनिटांचे भाषण केले. त्यांच्या भाषणामुळे काँग्रेस नेत्यांच्या टिप्पण्यांमुळे वाद निर्माण झाला. सोनिया गांधींनी द्रौपदी मुर्मूंसाठी ‘पुअर लेडी’ हा शब्द वापरला. ‘बिचाऱ्या राष्ट्रपती भाषण करता करता दमल्या’ असे त्या म्हणाल्या. तर, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मूर्मू यांच्या भाषणाचा उल्लेख ‘रटाळ’ असा केला. राष्ट्रपतींनी भाषणादरम्यान खोटी आश्वासने दिल्याचेही राहुल गांधी म्हणाले. काँग्रेस नेत्यांनी केलेल्या या खोचक टिप्पणीमुळे भाजपने याला आदिवासी समाजाचा अपमान असे म्हटले. तसेच राष्ट्रपती भवनानेही यावर मतप्रदर्शन करत ‘विरोधी पक्षांच्या खासदारांचे विधान दुर्दैवी असून सर्वोच्च पदाच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचवणारे आहे. अशा टिप्पण्या टाळल्या पाहिजेत.’ असे स्पष्ट केले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करून अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात केली. मात्र, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सोनिया गांधींसह काही काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या विधानांमुळे वाद निर्माण झाला आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाष्य करताना त्यांना ‘पुअर लेडी’ असे म्हटले.
राष्ट्रपती भवनानेही काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या टिप्पण्यांवर एक निवेदन जारी केले आहे. ‘राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी केलेल्या टिप्पण्यांमुळे पदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचलेला आहे.’ असे राष्ट्रपती भवनाने म्हटले आहे. काँग्रेस नेत्यांनी केलेले वक्तव्य चुकीचे असून राष्ट्रपती कधीही थकलेले दिसत नव्हते. त्यांचे भाषण कधीही कंटाळवाणे होऊ शकत नाही, असेही स्पष्ट करण्यात आले. राष्ट्रपती भवनाने काँग्रेस नेत्यांच्या टिप्पण्या अस्वीकार्य असल्याचे आपल्या निवेदनात म्हटले आहे.
काँग्रेस नेतृत्व अहंकारी - भाजप
भाजप नेत्यांनीही काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रपतींचा अपमान केल्याबद्दल आणि विधाने केल्याबद्दल सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजप नेते करत आहेत. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोनिया गांधी यांच्या विधानावर हल्लाबोल केला. “द्रौपदी मुर्मू ह्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहेत. असे असताना एका राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्या राष्ट्रपतींबद्दल असे कसे बोलू शकतात? सोनिया गांधी यांचे पुत्र राहुल गांधी यांनी भाषणाला कंटाळवाणे असे संबोधले होते. हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? मला वाटते की काँग्रेस पक्षाचे सध्याचे नेतृत्व अहंकारी आहे.” असे ते म्हणाले.
काँग्रेसने माफी मागावी : जे. पी. नड्डा
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. न•ा यांनी सोनिया गांधी यांच्या राष्ट्रपतींवरील टिप्पणीबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. सोनिया गांधींनी आपल्या विधानात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी ‘पुअर लेडी’ हा शब्दप्रयोग वापरला आहे. या वक्तव्याचा मी आणि प्रत्येक भाजप कार्यकर्ता तीव्र निषेध करतो. अशा शब्दांचा जाणीवपूर्वक वापर काँग्रेसच्या गरीबविरोधी आणि आदिवासीविरोधी स्वभावाचे प्रतिबिंबित करतो. याप्रकरणी काँग्रेसने राष्ट्रपती महोदय आणि आदिवासी समुदायाची बिनशर्त माफी मागावी अशी मागणीही न•ा यांनी केली.