सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली
शिमलामधील रुग्णालयात उपचार
वृत्तसंस्था/ शिमला
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा रक्तदाब शनिवारी अचानक वाढला. त्यांना उपचारासाठी शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज (आयजीएमसी) रुग्णालयात आणण्यात आले. येथे डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली. शिमलातील इस्पितळात त्यांची नियमित आरोग्य तपासणी केल्यानंतर काही वेळाने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. डॉक्टरांनी ईसीजी आणि एमआरआय सारख्या चाचण्या केल्या आहेत. तपासणीनंतर त्या परत निघून गेल्या. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
सोनिया गांधी सोमवार, 2 जून रोजी सुट्टी घालवण्यासाठी शिमला येथे पोहोचल्या होत्या. त्या आपली मुली आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांच्या छराबडा येथील खासगी निवासस्थानी वास्तव्यास होत्या. याचदरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यानंतर त्यांना आयजीएमसी येथे आणण्यात आले. जिथे त्यांची तपासणी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार (माध्यम) नरेश चौहान यांनी याबाबत माहिती देताना काही किरकोळ आरोग्य समस्यांमुळे सोनिया गांधींना तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आले होते. काळजी करण्यासारखे काही नाही, त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे स्पष्ट केले आहे.