तेलंगणातून निवडणूक लढविणार सोनिया गांधी?
रायबरेली मतदारसंघ सोडण्याची शक्यता : तेलंगणा काँग्रेसकडून प्रस्ताव संमत
वृत्तसंस्था /हैदराबाद
लोकसभा निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलेले असताना तेलंगणा काँग्रेसने सोनिया गांधी यांच्यासंबंधी एक प्रस्ताव संमत केला आहे. माजी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी तेलंगणातून लोकसभा निवडणूक लढवावी असा प्रस्ताव प्रदेश काँग्रेसने संमत केला आहे. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी आता रायबरेली मतदारसंघ सोडणार असल्याचे मानले जात आहे. सोनिया गांधी या तेलंगणातील मेडक मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात असे बोलले जातेय. या मतदारसंघातून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही निवडणूक लढविली होती. सोनिया गांधींनी तेलंगणातून निवडणूक लढविल्यास पूर्ण दक्षिण भारतात पक्षाला लाभ होणार असल्याचा दावा काँग्रेस नेते मधु याक्षी गौड यांनी केला आहे.
सोनिया गांधी सध्या रायबरेलीच्या खासदार आहेत. रायबरेली हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मागील 4 निवडणुकांमध्ये सोनिया गांधी येथे विजयी झाल्या आहेत. प्रत्येक निवडणुकीत त्यांना 50 टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळाली आहेत. देशात आतापर्यंत झालेल्या 17 लोकसभा निवडणुकांपैकी 3 निवडणुकांना वगळल्यास प्रत्येकवेळी काँग्रेसच येथे विजयी झाला आहे. देशाच्या 72 वर्षांच्या निवडणुकीच्या इतिहासात उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघ 66 वर्षांपर्यंत काँग्रेसकडे राहिला आहे. रायबरेली हा मतदारसंघ सोनिया गांधींनी सोडल्यास त्यांच्या कन्या आणि काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी-वड्रा यांना येथील उमेदवारी मिळू शकते असे मानण्यात येते. उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी अलिकडेच प्रियांका वड्रा आणि राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशातील मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्याचे आवाहन केले होते. राहुल गांधी यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता. या मतदारसंघातून राहुल गांधी हे यापूर्वी तीनवेळा विजयी झाले होते. राहुल गांधी हे यावेळी अमेठीतून निवडणूक लढविणार की नाही हे काँग्रेसने अद्याप स्पष्ट केलेले नाही. राहुल गांधी सध्या केरळच्या वायनाड मतदारसंघाचे खासदार आहेत. आगामी लोकसभा निवडणूक राहुल गांधी हे वायनाड येथूनच लढवतील असे पक्षाने स्पष्ट केले आहे. परंतु इंडिया आघाडीत सामील डाव्या पक्षांनीही वायनाड मतदारसंघावर दावा केला आहे.