Konkan Tourist : सोनवी पूलावर नित्याची वाहतूक कोंडी, नेत्यांचे सपशेल दुर्लक्ष
लोक प्रतिनिधींचे विषयाकडे गंभीर दुर्लक्ष, वाहन चालकांनी तीव्र नाराजी
संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर येथील सोनवी पूल परिसरात चौपदरीकरणाच्या कामामुळे वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागतो. चारचाकी वाहनांबरोबच अवजड वाहनेही ये-जा करीत असल्याने कोंडीतून सुटका होण्यासाठी एक ते दोन तास लागतात. त्यामुळे पर्यटकांसह नागरिकांना ठरलेल्या वेळेत नियोजित ठिकाणी पोहोचणे अवघड होत आहे.
सध्या उन्हाळी सुट्यांमुळे चाकरमान्यांसह पर्यटकांची पावले पर्यटनस्थळांकडे वळल्याने वाहतुकीत भर पडली आहे. वाहतूक पोलिसांसह ठेकेदाराकडून योग्य नियोजन होत नसल्याने ही परिस्थिती निर्माण होत आहे. येथील काम पूर्ण होणे सध्यातरी अशक्य असल्याने पावसाळ्यात प्रशासनाची सत्वपरीक्षाच आहे. लोक प्रतिनिधींचे या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे वाहन चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबईच्या दिशेने जाताना संगमेश्वर येथील विश्रामगृहाच्या वळणापासून वाहनांच्या रांगा लागण्यास सुरुवात होते ती अगदी पुढे अर्धा किलोमीटर अंतरावर सुरू असलेल्या सोनवी पुलापर्यंत सुरू राहते. कासव गतीने वाहन चालविण्याचा अनुभव या परिसरात चालकांना येत आहे. शनिवार, रविवारी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत तर वाहनांची प्रचंड गर्दी असते. या कालावधीत या परिसरातून प्रवास करणे म्हणजे डोकेदुखी ठरत आहे.
लोखंडी किंवा अवजड वस्तू वाहून नेणारे ट्रेलर, ट्रक हे या रांगांमध्ये असतील तर इंचइंच पुढे सरकण्यासाठी अर्धा तास एकाच ठिकाणी उभे राहण्याशिवाय पर्याय उरत नाही. ही परिस्थिती अनेक प्रवाशांनी मांडली आहे. याचवेळी एखादी रुग्णवाहिका आली, तर मोठीच पंचाईत होते. त्या रुग्णवाहिकेला जागा मोकळी करून देण्यासाठी वाहन चालकांची धडपड सुरू असते.
संगमेश्वर एसटी बसस्थानकासमोर वाहतूक पोलीस उभे राहून पुलावरून वाहने सुरळीत आहे किंवा नाही ते पाहत असतात. मात्र, पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अऊंद भागाच्या ठिकाणी आवश्यक असलेल्या परिसरात वाहतूक पोलीस दिसत नाहीत. त्यामुळे अनेक बेशिस्त चालक रिकामी जागा मिळाली की तिथे गाड्या नेऊन उभ्या करतात. या गोंधळात कोंडी अधिक वाढत जाते.
अशा वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संगमेश्वर शास्त्राr पुलाजवळ ठेकेदाराकडूनही तजवीज करणे आवश्यक आहे; अन्यथा सुटीच्या कालावधीत रोजच वाहतूक कोंडीचे हे रडगाणे सांगत प्रवास करावा लागणार आहे. याकडे पोलीस यंत्रणेकडूनही गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
वाहतूक कोंडीचा बसतोय फटका
संगमेश्वर बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडी झाल्यामुळे नियोजित ठिकाणी वेळेत पोहोचता आले नाही. त्यामुळे सुमारे एक तासाहून अधिककाळ या परिसरातच गाडी थांबवून वाहतूक कोंडीचा फटका बसला. पंकज चवंडे, प्रवासी
गांभीर्याने पाहिले जात नाही
सोनवी पूल येथील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी वारंवार प्रशासनाला विनंती केली आहे, पण त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. हा विषय किमान पुढील महिन्याभरासाठी कसा सोडविता येईल याकडे पाहिले पाहिजे. तसेच पावसाळ्यातही निर्माण होणाऱ्या अडचणींवर आतापासूनच लक्ष द्यावे अन्यथा प्रवासी आणि वाहन चालकांसाठी प्रवासी वाहतूक संघटना रस्त्यावर उतरेल. परशुराम पवार , संगमेश्वरवाहतूक