सोनारिका भदौरियाला कन्यारत्न
टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनारिका भदौरियाने एका मुलीला जन्म दिला आहे. विवाहाच्या एक वर्षाने ती आई झाली आहे. स्वत:च्या नवजात मुलीचे छायाचित्र शेअर करत सोनारिकाने स्वत:च्या चाहत्यांना ही गूडन्यूज दिली आहे. तिने इन्स्टाग्राम अकौंटवर नवजात मुलीचे छायाचित्र शेअर केले आहे. या छायाचित्रात सोनारिका आणि तिचा पती विकास पराशर हे मुलीचे पाय हातात धरून असल्याचे दिसून येते. छायाचित्रात दांपत्याचे हात आणि मुलीचे केवळ पाय दिसून येत आहेत. परंतु अभिनेत्रीने अद्याप स्वत:च्या मुलीचे नाव जाहीर केलेले नाही. तर या पोस्टनंतर अनेक कलाकार आणि चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सोनारिकाने विकास पराशरसोबत 2024 मध्ये विवाह केला होता. दोघेही अनेक वर्षांपासून परस्परांना डेट करत होते. विकास एक उद्योजक असून तो रियल इस्टेटमध्ये सक्रीय आहे. तसेच तो ग्लॅमर जगतापासून दूर राहणे पसंत करतो. सोनारिकाने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ती काही चित्रपटांमध्येही दिसून आली आहे. ती अखेरची 2019 साली ‘इश्क में मरजावां’ मालिकेत दिसून आली होती.