For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोनम वांगचुक यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

06:05 AM Oct 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
सोनम वांगचुक यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
Advertisement

पोलीस स्थानकातच  उपोषण : 700 किमी पायपीट करून दिल्लीत पोहोचले :  लडाखला राज्याचा दर्जा देण्याची मागणी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

लडाखपासून सुमारे 700 किमीची पदयात्रा करत दिल्लीत पोहोचलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक समवेत 120 जणांना सोमवारी रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. वांगचुक यांना दिल्लीच्या बवाना पोलीस स्थानकात नेण्यात आले, जेथे त्यांनी अनिश्चित काळापर्यंत उपोषण सुरू केले आहे.  वांगचुक हे दिल्ली सीमेवर रात्री थांबू इच्छित होते. दिल्लीत 5 ऑक्टोबरपर्यंत कलम 163 लागू आहे.  मोर्चा काढू पाहणाऱ्या लोकांना परत जाण्यास सांगण्यात आले होते. त्यांनी नकार दिल्याने कारवाई करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले.

Advertisement

लडाखचे खासदार हाजी हनीफा यांनी मंगळवरी सकाळी वांगचुक यांच्या निदर्शनात सामील होण्यासाठी सिंघू सीमेवर धाव घेतली. पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या समर्थकांनाही ताब्यात घेत नरेला पोलीस स्थानकात हलविले आहे.

लेह अपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रेटिक अलायन्स मागील 4 वर्षांपासून लडाखला राज्याची दर्जा देण्याची मागणी करत आहेत. याचसंबंधी एक महिन्यांपूर्वी वांगचुक यांनी सुमारे 120 लोकांसोबत लेहपासून दिल्लीत महात्मा गांधी यांच्या स्मृतिस्थळापर्यंत पदयात्रा सुरू केली. त्यांनी या पदयात्रेला दिल्ली चलो नाव दिले होते. सोमवारी रात्री उशिरा दिल्ली पोलिसांनी त्यांना रोखले आहे.

दिल्लीच्या सीमेवर मला ताब्यात घेण्यात आले. येथे 1 हजार पोलीस असल्याचे काही लोक सांगत आहेत. आमच्यासोबत अनेक वृद्ध आहेत. आमच्या नशीबात काय हे आम्हाला माहित नाही. आम्ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि लोकशाहीच्या जननीत महात्मा गांधींच्या स्मृतिस्थळापर्यंत शांततेत पदयात्रा काढत होतो असा दावा वांगचुक यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केला आहे.

वांगचुक यांना बवाना पोलीस स्थानकात वकिलांना भेटू दिले जात नसल्याचा दावा त्यांच्याशी संबंधित लोकांनी केला आहे. याचमुळे वांगचुक यांनी इतर समर्थकांसोबत उपोषण सुरू केले. वांगचुक यांनी या पदयात्रेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना ईमेल पाठवून अनुमती मागितली होती.

खासदाराचा दावा

सोमवारी रात्री उशिरा वांगचुक यांना ताब्यात घेण्यात आल्यावर सिंघु सीमेवर लडाखचे खासदार हाजी हनीफा जान पोहोचले. पोलिसांनी 30 महिलांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांना पुरुषांसोबत ठेवण्यात आल्याचा दावा लडाखच्या खासदाराने केला आहे. तर दिल्ली पोलिसांनी मंगळवारी सकाळी हनीफा यांनाही ताब्यात घेतले. लडाख पर्यावरण आणि घटनात्मक अधिकारांच्या रक्षणासाठी सरकारसोबत चर्चा करू इच्छित आहे. मागील 3 वर्षांपासून आम्ही आमच्या अधिकारांसाठी शांततेत लढत होतो. याचकरता आम्ही सरकारसोबत चर्चा केली होती. परंतु निवडणूक आणि नवे सरकार स्थापन झाल्यावर त्यांनी चर्चा बंद केल्याचा दावा खासदाराने केला.

पर्यावरण आणि घटनात्मक अधिकारांसाठी शांततेत मोर्चा काढणाऱ्या सोनम वांगचुक आणि शेकडो लोकांना ताब्यात घेणे योग्य नाही. लडाखच्या भविष्यासाठी उभे ठाकलेल्या वृद्ध नागरिकांना दिल्ली सीमेवर ताब्यात का घेतले जात आहे. कृषी विधेयकांमध्ये मोदींचा हा चक्रव्यूह आणि अहंकार मोडणार आहे. लडाखचा आवाज सरकारला ऐकावाच लागेल.

काँग्रेस खासदार, राहुल गांधी

सरकार कशाप्रकारे काम करत आहे हेच समजेनासे झाले आहे. सोनम वांगचुक लडाखमधील सन्माननीय व्यक्ती आहेत. पूर्ण भारतात लोक त्यांचा आदर करतात. त्यांनी लडाख ते राजघाटपर्यंत शांततेत पदयात्रा काढण्याची योजना तयार केली. त्यांच्यासोबत अनेक काँग्रेस नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्व जण स्वत:च्या वैध अधिकारांची मागणी करत आहेत.

काँग्रेस महासचिव के.सी. वेणुगोपाल

Advertisement
Tags :

.