सोनम वांगचुक यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
दिल्लीत लडाख भवनबाहेर करत होते निदर्शने
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि 20 अन्य निदर्शकांना दिल्ली पोलिसांनी रविवारी लडाख भवनाबाहेर निदर्शने केल्याबद्दल ताब्यात घेतले आहे. वांगचुक यांच्यासोबत उपोषणाला बसलेल्या सुमारे 20-25 निदर्शकांना ताब्यात घेण्यात आले आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी संबंधित क्षेत्रात मोठ्या संख्येत पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
काही निदर्शकांनी आपण निदर्शने करत नव्हतो असा युक्तिवाद केला. परंतु निदर्शकांकडे लडाख भवनाबाहेर बसण्याची कुठलीच अनुमती नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. जंतर मंतर येथे निदर्शने करण्यासाठी अर्ज करण्यात आला असून तो विचाराधीन आहे. संबंधितांना अन्य कुठल्याही जागी निदर्शने करण्याची अनुमती नाही. काही लोकांना आम्ही ताब्यात घेतले असून लवकरच त्यांची सुटका केली जाणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
लडाखला घटनेच्या सहाव्या अनुसूचीत सामील करण्याच्या मागणीवरून वांगचुक यांनी स्वत:च्या समर्थकांसोबत लेह ते दिल्लीपर्यंत पदयात्रा काढली होती. यापूर्वी 30 सप्टेंबर रोजी दिल्ली पोलिसांनी राजधानीच्या सिंघू बॉर्डरवर त्यांना ताब्यात घेतले होते आणि 2 ऑक्टोबर रोजी त्यांना मुक्त केले होते. वांगचुक आणि त्यांचे समर्थक पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत वरिष्ठ नेत्यांच्या भेटीची मागणी करत आहेत.
घटनेच्या 6 व्या अनुसूचीत ईशान्येतील राज्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरमच्या आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनाची तरतूद सामील आहे. यामुळे स्वायत्त परिषदेची स्थापना केली जाते. या परिषदेकडे संबंाित क्षेत्रांवर स्वतंत्रपणे शासन करण्यासाठी अधिकार असतात. लडाखला राज्याचा दर्जा देणे आणि लडाखसाठी लोकसेवा आयोग स्थापन करण्यासोबत लेह आणि कारगिल जिल्ह्यांसाठी वेगवेगळे लोकसभा मतदारसंघ निर्माण करण्याची मागणी निदर्शक करत आहेत.