For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोनम रघुवंशी जामिनावरच राहणार

06:30 AM Jul 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
सोनम रघुवंशी जामिनावरच राहणार
Advertisement

सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले मेघालयचे अपील

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मधुचंद्रासाठी मेघालय राज्यात गेलेल्या राजा रघुवंशीच्या हत्येचा आरोप असणारी त्याची पत्नी सोनम रघुवंशी हिचा जामीन सर्वोच्च न्यायालयानेही राखला आहे. या संदर्भात मेघालय उच्च न्यायालयाने दिलेला आदेश योग्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हा राजा रघुवंशीच्या कुटुंबियांना मोठा धक्का आहे.

Advertisement

न्या. एम. एम. सुंदरेश आणि न्या. शील नागू यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला आहे. 29 जूनला सोनम रघुवंशीला उच्च न्यायालयाने जामीन संमत केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने जी कारणे जामीन संमत करण्यासाठी दिली आहेत, त्यांच्याशी आम्ही संमत नाही. तथापि, आता या महिलेची जामिनावर सुटका झाली आहे, त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयाच्या या निर्णयात हस्तक्षेप करणार नाही, असे आपल्या निर्णयपत्रात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणात महाधिवक्ता तुषार मेहता यांनी मेघालय सरकारची बाजू न्यायालयात मांडली आहे.

आदेश रद्दही केला असता...

उच्च न्यायालयाच्या निर्णयाशी आम्ही पूर्णत: सहमत आहोत असे नाही. आम्ही उच्च न्यायालयाला आदेश रद्दही करण्याचा आदेश दिला असता. तथापि, या प्रकरणात तपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे सोनम रघुवंशी हिला कारावासात ठेवण्याचे कारण उरलेले नाही, असे दिसून येत आहे. तिची यापूर्वीच सुटका झाली आहे. जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत आरोपी निर्दोष मानला पाहिजे, हे तत्व आहे. त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप न करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना स्पष्ट केले आहे.

प्रकरण काय आहे...

मे 2025 मध्ये इंदूरचे उद्योजक राजा रघुवंशी यांचा विवाह सोनम रघुवंशी हिच्याशी झाला होता. विवाहानंतर हे जोडपे मधुचंद्र साजरा करण्यासाठी मेघालय राज्यात गेले होते. हे जोडपे नॉनग्रियाट येथे एका हॉटेलात उतरले होते. तथापि, त्यानंतर 23 मेपासून ते बेपत्ता झाले. नंतर राजा रघुवंशी यांचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह खोल दरीतून बाहेर काढण्यात आला. तर सोनम रघुवंशी आणखी काही दिवसांनंतर उत्तर प्रदेशमध्ये वास्तव्यास असलेली आढळून आली. तिनेच प्रथम आपल्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने पतीचा खून केला आणि नंतर त्याचा मृतदेह दरीत ढकलला, असा तिच्यावर आरोप आहे. या कृतीत तिला आणखी तीन जणांनी साहाय्य केल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. तथापि, आरोपपत्रात काही टायपिंगच्या चुका झाल्याचे आढळून आल्याने तिला मेघालय उच्च न्यायालयाने जामीन संमत केला होता. मेघालय सरकारने या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. मात्र, ते फेटाळले गेले आहे.

सरकारकडून युक्तिवाद

केवळ एका टायपिंगच्या चुकीमुळे गंभीर गुन्ह्यात आरोपीला जामीन देण्यात आला आहे. टायपिंगची चूक जामीन देण्यासाठी पुरेसे कारण असू शकत नाही, असे अन्य एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानेच स्पष्ट केले आहे. अशा स्थितीत उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करण्यात यावा. सोनम रघुवंशी हिची सुटका करण्यात आली आहे, असा युक्तिवाद महाधिवक्ता तुषार मेहता यांनी केला होता.

Advertisement
Tags :

.