For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोल्हापूरच्या सोनमचा अचूक निशाणा; आशियाई क्रीडा स्पर्धेत सांघिक रौप्य

02:04 PM Sep 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
कोल्हापूरच्या सोनमचा अचूक निशाणा  आशियाई क्रीडा स्पर्धेत सांघिक रौप्य
Advertisement

| संग्राम काटकर, कोल्हापूर : नेमबाजीची आवड जोपासण्यासाठी हातात घेतलेली एअर रायफल सोनम उत्तम मस्कर हिच्या कारकिर्दीला नवी दिशा देणारी ठरली. आर्थिक अडचणी आणि संघर्षावर मात करत तिने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली. जपानमध्ये सुरू असलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील नेमबाजी प्रकारात सांघिक रौप्यपदक पटकावत सोनमने कोल्हापूरचे नाव उज्ज्वल केले.

Advertisement

सोनमच्या या यशामागे तिचे वडील उत्तम मस्कर यांचा मोठा त्याग आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वी सोनमकडे नेमबाजीच्या सरावासाठी रायफल नव्हती. मुलीची नेमबाजीतील आवड आणि जिद्द पाहून वडिलांनी आपली जागा आणि दुकान विकून मिळालेल्या पैशांतून सोनमसाठी रायफल व सरावाचे साहित्य घेतले. या त्यागाचे चीज करत सोनमने सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर नेमबाजी क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली.

सोनम मूळची गारगोटीजवळील पुष्पनगर (ता. भुदरगड) येथील आहे. 2020 पर्यंत ती कुटुंबासह मुंबईत राहत होती. 2018 ते 2020 या काळात तिने मुंबईतील तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स येथे नेमबाजीचा सराव सुरू केला. मात्र, कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे कुटुंबाला मुंबई सोडून गावी परतावे लागले. गावी आल्यानंतर कुटुंबाच्या दूध व्यवसायालाही आर्थिक फटका बसला. त्याच काळात सोनम पुन्हा नेमबाजीचा सराव सुरू करण्यासाठी प्रयत्नशील होती.

Advertisement

2021मध्ये ती वेध रायफल अँड पिस्तूल शूटिंग अकॅडमीत दाखल झाली. वडिलांनी जागा विकून मिळालेल्या पैशातून रायफल घेतल्यानंतर प्रशिक्षक राधिका बराले-हवालदार आणि रोहित हवालदार यांच्या मार्गदर्शनाखाली तिने सराव सुरू केला.

10 मीटर एअर रायफल प्रकारात सातत्याने कामगिरी उंचावत सोनम 2023 मध्ये चांगवाँग येथे झालेल्या आयएसएसएफ ज्युनिअर विश्वचषक स्पर्धेत पोहोचली. मात्र, या स्पर्धेत तिला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यानंतर आशियाई स्पर्धेतही चौथे स्थान मिळाले. या अपयशाने खचून न जाता तिने सराव सुरूच ठेवला.

2024 मध्ये दिल्ली येथे झालेल्या आयएसएसएफ ज्युनिअर विश्वचषक स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकारात अचूक निशाणा साधत सोनमने रौप्यपदक पटकावले. कैरो विश्वचषकातही तिने चांगली कामगिरी केली. कॅप्टन ईजिकल नेमबाजी स्पर्धेसह पश्चिम विभागीय स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर राष्ट्रीय खुल्या नेमबाजी स्पर्धेसाठी तिची निवड झाली.

राष्ट्रीय रायफल असोसिएशनच्या पात्रता चाचण्यांमध्येही सोनमने चांगली कामगिरी केली. त्यानंतर ज्युनिअर इंटरनॅशनल नेमबाजी स्पर्धेसाठी तिची निवड झाली. या स्पर्धेत तिने सांघिक सुवर्णपदक मिळवले. पुढील आंतरराष्ट्रीय आणि ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील कामगिरीच्या जोरावर तिची सिनिअर वर्ल्डकपसाठी निवड झाली. या स्पर्धेत तिने वैयक्तिक रौप्यपदक पटकावले.

विविध नेमबाजी चाचण्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर सोनमची जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. या संधीचे सोने करत तिने सांघिक रौप्यपदक जिंकले.

‘सोनम ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल’

“सोनम ही मेहनती नेमबाज आहे. स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी ती कायम प्रयत्नशील असते. अपयश आले तरी ते पचवून पुन्हा नव्या जोमाने सराव करण्याची ताकद तिच्यात आहे. तिच्या सरावाची दिशा आणि सातत्य पाहता सोनम भविष्यात ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल, अशी तिची तयारी आहे,” असा विश्वास आंतरराष्ट्रीय नेमबाज तथा सोनमच्या प्रशिक्षक राधिका बराले-हवालदार यांनी व्यक्त केला.

Advertisement
Tags :

.