‘बागी 4’मध्ये सोनम बाजवाची एंट्री
साजिद नाडियाडवालाकडून निर्मित ‘बागी’ फ्रेंचाइजीच्या पुढील चित्रपटातही टायगर श्रॉफच मुख्य भूमिकेत असेल. आता या चित्रपटातील नायिकेवरून माहिती समोर आली आहे. ‘बागी’ आणि ‘बागी 2’ या चित्रपटांमध्ये टायगरच्या नायिका म्हणून श्रद्धा कपूर आणि दिशा पाटनी यांनी काम केले होते. तर तिसऱ्या चित्रपटात टायगरसोबत पुन्हा श्रद्धा दिसून आली होती. आता चौथ्या चित्रपटात एका पंजाबी अभिनेत्रीची एंट्री झाली आहे. सोनम बाजवा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. यात ‘बागी 4’ हा चित्रपट देखील सामील आहे. सोनम पहिल्यांदाच टायगरसोबत मोठ्या पडद्यावर स्वत:च्या सौंदर्याची जादू दाखविणार आहे. या चित्रपटात सोनमचा एक डान्स नंबर असेल, ज्याकरता तिला मास्टर गणेश आचार्यकडून प्रशिक्षण मिळाले आहे. सोनमच्या या डान्स नंबरचे मुंबईत 3 दिवसांपर्यंत चित्रिकरण करण्यात आले आहे. सोनमचा हा चित्रपट 5 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तर या चित्रपटाचा ट्रेलर पुढील काळात प्रेक्षकांसाठी सादर केला जाणार आहे. सोनम ही यापूर्वी ‘हाउसफूल 5’ या चित्रपटात दिसून आली होती.