बांगलादेशातून भारतात आणली जाणार सोनाली खातून
सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर केंद्र सरकारची तयारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गरोदर महिला सोनाली खातून आणि तिचा 8 वर्षीय मुलगा सबीरला मानवीय आधारावर बांगलादेशातून भारतात परत आणले जाणार असल्याचे केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे. ही घोषणा सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर केली आहे. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सोनाली खातून आणि तिच्या 8 वर्षीय मुलाला मानवीय आधारावर भारतात प्रवेशाची अनुमती दिली आहे. तसेच न्यायालयाने बीरभूमच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना महिलेला वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करणे आणि पश्चिम बंगाल सरकारला मुलाची देखभाल करण्याचा निर्देश दिला आहे.
मानवीय आधारावर सोनाली खातून आणि तिचा पुत्र सबीरला प्रक्रियेचे पालन करत भारतात आणले जाईल. हे पाऊल कुठल्याही गुणवत्तेशिवाय आमच्या कुठल्याही तर्काला प्रभावित न करता आणि त्यांना देखरेखीत ठेवण्याच्या आमच्या अधिकारांना सुरक्षित ठेवत उचलले जाणार आहे. याप्रकरणामुळे अन्य प्रकरणे प्रभावित होणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
न्यायालयाच्या विचारणेनंतर भूमिकेत बदल
सोनाली आणि तिच्या मुलाला मानवीय आधारावर परत आणले जाऊ शकते का अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केली होती. यावर बुधवारी सरकारकडून निर्देश घेतल्यावर सॉलिसिटर जनरल मेहता यांनी याची सहमती दिली. सोनालीला दिल्लीत ताब्य2ात घेण्यात आले होते, यामुळे तिला प्रथम दिल्लीतच आणले जाईल असे खंडपीठाने स्वत:च्या आदेशात म्हटले आहे. तर प्रतिवाद्यांकडून उपस्थित वरिष्ठ वकीलाने सोनालीला बीरभूम (पश्चिम बंगाल) येथील तिच्या पित्याच्या घरी पाठविणे योग्य ठरेल अशी सूचना केली.
वैद्यकीय सुविधा अन् देखभालीची जबाबदारी
गरोदरपणा विचारात घेत सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला सोनालीला पूर्णपणे मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करविण्याचा निर्देश दिला अहे. तसेच राज्य सरकारला तिचा पुत्र सबीरची देखभाल करण्याचाही निर्देश देण्यात आला.
प्रकरण काय आहे?
27 सप्टेंबर रोजी विशेष अनुमती याचिकेवर सुनावणी करत कलकत्ता उच्च न्यायालयाने काही लोकांना भारतात परत आणण्याचा आदेश दिला होता. हा र्नाय भोदू शेख यांच्याकडुन दाखल याचिकेवर देण्यात आला होता. त्यांनी स्वत:ची मुलगी, जावई आणि नातवाला न्यायालयासमोर हजर करण्याची मागणी केली होती. या लोकांना दिल्लीत ताब्यात घेत बांगलादेशात पाठविण्यात आले होते.